sujeet zaware in nagar | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पारनेर तालुक्‍यात गटबाजी उफाळली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

नगर : तेथे थोड्या स्वरुपात राडा झाला. बाचाबाचीही झाली. दोन गटांमधली दुफळी पुन्हा उफळून आली. पण आपल्याच अब्रू पक्षाची वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी त्यावर पांघरून घातले. झाकली मुठ सव्वालाखाची ठेवून अध्यक्षांच्या कानापर्यंत हा विषय जाऊ दिला नाही. या विषयाची चर्चा तालुकाभर झाली, पण कोणी बोलायचे नाव घेईना. पण विरोधक ते विरोधकच. याची बोंबाबोंब करण्यावाचून थोडेच गप्प बसणार. त्यांनी दवंडी पिटविलीच. 

नगर : तेथे थोड्या स्वरुपात राडा झाला. बाचाबाचीही झाली. दोन गटांमधली दुफळी पुन्हा उफळून आली. पण आपल्याच अब्रू पक्षाची वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी त्यावर पांघरून घातले. झाकली मुठ सव्वालाखाची ठेवून अध्यक्षांच्या कानापर्यंत हा विषय जाऊ दिला नाही. या विषयाची चर्चा तालुकाभर झाली, पण कोणी बोलायचे नाव घेईना. पण विरोधक ते विरोधकच. याची बोंबाबोंब करण्यावाचून थोडेच गप्प बसणार. त्यांनी दवंडी पिटविलीच. 

त्याचे झाले असे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मागील आठवड्यात नगरला विविध कार्यक्रमानिमित्त आले होते. पुणेमार्गे येताना सुपे येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सत्कार स्वीकारण्याची विनंती केली. सुपे बसस्थानकाजवळच कार्यकर्ते पवार यांची वाट पाहत थांबले. दरम्यान पवार आल्यानंतर त्यांना हार कोणी घालायचा, यावरून पक्षातील दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. 

मागील अनेक दिवसांचे शत्रूत्व व एकमेकांतील गटबाजीचा परिणाम दिसून आला. मात्र ही गटबाजी शरद पवार यांच्या लक्षात येण्याच्या आधीच तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी झावरे यांना गाडीत बसा, नगरला चला, असे सांगितले, पण नगरला गेल्यास मागे मोठा राडा होईल, या भितीने झावरे यांनी तेथेच थांबणे पसंत करून संबंधित दोन गटातील कार्यकर्त्यांना शांत केले. झालेल्या या प्रकाराची चर्चा दबक्‍या आवाजात पण तालुकाभर पसरली. राष्ट्रवादीत पारनेर तालुक्‍यातील गटबाजी उघडकीस आली. याचा परिणाम पक्षवाढीवर होणार असल्याने आगामी काळात पक्षांतर्गंत बदलाच्या हालचाली होण्याची चिन्हे आहेत. 

सरपंच बदलाच्या हालचाली 
राष्ट्रवादीच्या या राड्याचा परिणाम सुपे येथील सरपंचपद धोक्‍यात आले आहे. सरपंच बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच अविश्वासाचा ठराव दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे कार्यकर्त्यांतून चर्चिले जात आहे. तशी तयारीही दुसऱ्या गटाने केली असल्याचे समजते. 

कार्यकर्ते वरिष्ठांना भिडले 
या वादाचा परिणाम म्हणजे एका गटाचे कार्यकर्ते थेट राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांना जाऊन भेटले. पक्षात अंतर्गत सुरू असलेली धुसफूस त्यांनी वरिष्ठांना सांगितली. वळसे पाटलांनीही शेलक्‍या शब्दांत समाचार घेत पक्ष कोणाच्या मालकीचा नसून लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे खडे बोल सुनावले, असल्याचे समजते. 

वाद मिटला, तात्पुरता होता : झावरे 
पक्षात झालेल्या या राड्याबाबत राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना विचारले असता, त्यांनी झालेल्या वादाबाबत दुजोरा दिला. हा वाद स्थानिक पातळीवर व तात्पुरत्या स्वरुपाचा होता. तो आता मिटला आहे. त्याचे भांडवल होऊ नये. आगामी काळात आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादीची ताकद विरोधकांना दाखवून देऊ, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आम्ही लढणार आहोत, असे झावरे यांनी "सरकारनामा' शी बोलताना सांगितले. 
 

संबंधित लेख