sugercane frp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

एफआरपी 250 रुपयांनी वाढली ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मे 2017

नुकत्याच संपलेल्या हंगामात साखरेला चांगला दर असल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीपेक्षा प्रतिटन 175 रुपये जादा दिले आहेत. 

कोल्हापूर : यावर्षीच्या (सन 2017-18) साखर हंगामात उसाच्या "एफआरपी' त प्रतिटन 250 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाने पहिल्या साडेनऊ रिकव्हरीला प्रतिटन 2550 तर त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला प्रतिटन 268 रुपये कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. पूर्वी हा दर अनुक्रमे 2300 व 242 रुपये होता. देशात भाजपचे सरकार आल्यापासून एफआरपीतील ही दुसरी वाढ आहे. 

दरम्यान, राज्याचा सरासरी उतारा 11.50 आहे, याचा विचार करताना राज्यात या निर्णयाने तोडणी-ओढणी वजा जाता उत्पादकांना प्रतिटन 2486 रुपये मिळतील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा सरासरी उतारा 12.50 आहे, त्यामुळे या दोन जिल्ह्यात तोडणी-ओढणीचा खर्च वजा जाता उत्पादकांना प्रतिटन 2754 रुपये मिळणार आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात या निर्णयाने प्रतिटन 300 रुपये जादा मिळणार आहेत. 

उसाच्या "एफआरपी' त वाढ करण्याची शिफारस केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गेल्या महिन्यात केंद्र सरकारला केली होती. त्यावेळच यावर्षी उसाच्या एफआरपीत घसघशीत वाढीचे संकेत मिळाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाढीचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 2014 साली भाजपचे सरकार आले, त्यानंतर 2015-16 च्या हंगामात सरकारने पहिल्या साडेनऊ रिकव्हरीसाठी प्रतिटन 2300 रुपये व पुढील प्रत्येक टक्‍क्‍यांस 230 रुपये जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी या दरात वाढ केली आहे. 
गेल्या दोन हंगामात उसाचे व साखरेचे उत्पादन, त्यामुळे साखरेचे दर घसरले, परिणामी कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देता आली नव्हती. एफआरपी देण्यासाठी सरकारने कारखान्यांना दिलेले कर्ज यामुळे नुकत्याच संपलेल्या हंगामासाठी एफआरपीत वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता येणाऱ्या हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

 

राज्यात असा मिळेल दर (आकडे प्रतीटनाचे) 
राज्याचा सरासरी उतारा - 11.50 
पहिल्या 9.50 उताऱ्याला मिळणार - 2550 रुपये 
पुढील दोन टक्‍क्‍याचे - 568 रुपये 
एकूण मिळणारी रक्कम - 3086 रुपये 
तोडणी-ओढणीची रक्कम - 600 रुपये 
प्रत्यक्ष मिळणारी एफआरपी - 2486 

कोल्हापूर-सांगलीत मिळणारे दर (आकडे प्रतीटनाचे) 
सरासरी उतारा - 12.50 
पहिल्या 9.50 उताऱ्याला मिळणार - 2550 रुपये 
पुढील तीन टक्‍क्‍यांचे मिळणार - 804 रुपये 
एकूण मिळणारी रक्कम - 3354 रुपये 
वजा तोडणी-ओढणी - 600 रुपये 
प्रत्यक्ष मिळणारी एफआरपी - 2754 रुपये 

 

संबंधित लेख