suger prodcution | Sarkarnama

यावर्षीचे साखर उत्पादन निम्म्यावर ! 

निवास चौगले 
शनिवार, 29 एप्रिल 2017

बाजारात साखरेची मागणी नसल्याने व गुजरातसह इतर राज्यात उत्तरप्रदेशची साखर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी दराने मिळत असल्याने राज्यातील साखरेचा
उठावच नाही. 31 मार्च अखेर राज्यात सुमारे 41 लाख मेट्रिक टन साखर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. या साखरेमुळे कारखान्यांची गोदामे "हाऊसफुल्ल' आहेत. या
विचित्र परिस्थितीमुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा हा साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. 

कोल्हापूर : कमी झालेला पाऊस, त्यामुळे घटलेले उसाचे उत्पन्न यामुळे नुकत्याच संपलेल्या साखर हंगामात गेल्यावर्षीपेक्षा निम्मेच साखर उत्पादन झाले आहे.
गेल्यावर्षी राज्यात साखरेचे उत्पादन 84.15 लाख मेट्रिक टन झाले होते, यावर्षी ते 41.80 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आले आहे. 

यावर्षीचा हंगाम 10 एप्रिल रोजी संपला. नोव्हेंबरपासून 10 एप्रिलपर्यंत राज्यातील सहकारी 99 व खासगी 78 कारखान्यांनी हंगाम घेतला. या हंगामात राज्यात
372.45 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 41.80 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या 25 वर्षातील साखर उत्पादनाचा हा निच्चांक आहे. ज्या
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी किमान 200 लाख मेट्रिक टन ऊस गाळप होत होते, त्याठिकाणी केवळ 40 लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व
नगर विभागातही गेल्यावर्षीच्या तुलनेत 25 टक्केही गाळप झालेले नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात 75 टक्‍क्‍यापर्यंत गाळप झाले आहे. 

हंगामाच्या सुरवातीला राज्यात 37 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक होता. त्यात यावर्षीच्या 41.80 लाख मेट्रिक टन साखरेची भर पडली. राज्यातील
साखरेची गरज केवळ 28 ते 30 लाख मेट्रिक टन आहे. उर्वरित साखरेला गुजरातसह आंध्रप्रदेश, ओडीसा ही राज्ये बाजारपेठ आहेत. पण या राज्यात उत्तरप्रदेशची
साखर महाराष्ट्राच्या साखरेपेक्षा प्रतिटन 100 ते 150 रुपये कमी दराने मिळत असल्याने राज्यातील साखरेला या राज्यांतून मागणीच ठप्प आहे. परिणामी
कारखानदारांना एक तर राज्यातच ग्राहक शोधावे लागतील किंवा कमी दराने ती इतर राज्यात पाठवावी लागेल. पण दोन्ही व्यवहारात तोटा असल्याने त्याचा मोठा
आर्थिक फटका साखर उद्योगाला शक्‍य आहे. 

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षी 3 मे 2016 रोजी झालेल्या आढावा बैठकीत उसाचे क्षेत्र 1 लाख 47 हजार 952 हेक्‍टर होते. पुढील हंगामाचा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी 25 एप्रिल रोजी जिल्हा बॅंकेत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 905 हेक्‍टर क्षेत्र उसाखाली असल्याचे सांगण्यात आले. यावरून गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्रात 3 हजार हेक्‍टर क्षेत्राची घट झाली आहे. 

संबंधित लेख