sudhir munguntiwar`s order to forest officers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मंत्री सुधीरभाऊंच्या `हल्ल्यानंतर` वन अधिकारीच `पिंजऱ्यात`! क्लिप झाली व्हायरल

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नोकरशाही कशी काम करते, याचा अनुभव अनेकांना आहे. बिबट्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी थेट वनमंत्र्याकडे करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश न ऐकण्याची मनःस्थिती वनअधिकाऱ्यांची होती. मात्र त्यांनी सज्जड दम दिल्यानंतर पिंजरे लागले आणि त्यात बिबट्याही सापडला.

करमाळा : बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे दिले नाहीत तर निलंबित केले जाईल, असा सज्जड दम वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी देताच वन विभागातील सुस्त अधिकारी खडबडून जागे झाले आणि सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव (ता. करमाळा) येथे पिंजरा लावला. अन्‌ अखेर दोन महिन्यापासून दहशत पसरवलेला बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

यासंदर्भातील वनमंत्री मुंनगटीवार यांनी आधिकिऱ्यांची कान उघडणी केलेली क्लिप आता व्हायरल झाली आहे. उंदरगाव येथे बिबट्या दिसल्याची तक्रारी येथील नागरिकांनी वन विभागाकडे केली, परंतु त्याची योग्य ती दखल घेतली नाही. टोलवाटोलवी करुन बिबट्याचे ठसे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. पण बिबट्याची धास्ती घेतलेल्या नागरिकांनी एवढ्यावर न थांबता थेट वनमंत्र्यांकडे याची तक्रार केली. त्याची त्यांनी दखल घेतली.

त्रस्त झालेल्या याच भागातील वाशिंबे येथील संतोष वाळुंजकर यांनी 19 ऑगस्टला रात्री 9 वाजता वनमंत्री मुंनगटीवार यांना फोन लावला. बिबट्याबाबतची सर्व हाकीकत सांगितली. वाळुंजकर यांचा फोन सुरु असतानाच मुनगुंटीवार यांनी वन परिक्षेञ अधिकारी जयश्री पवार यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले आणि उंदरगाव परिसरात तात्काळ पिंजरे लावण्याचे आदेश दिले.

पवार यांनी मंत्र्यांशी संभाषण करताना आमच्या वरिष्ठांना सांगा. त्यांच्याच आॅर्डर मी फाॅलो करेन, असे एक वक्तव्य केले. त्यानंतर मुनगंटीवार चिडल्याचे क्लिपवरील संभाषणातून लक्षात येते. तुम्ही काय बोललात, अशी दोन-तीन वेळा त्यांनी पवार यांनी विचारणा केली. त्यानंतर गडबडलेल्या पवार यांनी तुमच्या आॅर्डर मी फाॅलो करेन, असे सांगितले.

"तुम्ही उद्या (सोमवार 20 ऑगस्ट) पाच वाजेपर्यंत पिंजरे लावले नाहीत, तर मी तुमच्यावर व संबंधित इतर खांडेकर, माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून, खात्याअंतर्गत चौकशी लावीन' असा इशारा त्यांनी दिला. तुमचे हे संभाषण मी रेकाॅर्ड करून ठेवत असल्याचेही मंत्र्यांना सांगावे लागले.

त्यानंतर वन विभागाने तीन पिंजरे या परिसरात लावले. दोन पिंजरे वाशिंबे परिसरात तर एक पिंजरा उंदरगाव परिसरात ठेवण्यात आला होता. उंदरगाव येथील माळीवस्ती परिसरात शनिवारी बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर येथे पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

संबंधित लेख