Sudhir Mungantiwar Tiger Safari | Sarkarnama

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

'चंद्रपूर- बल्‍लारपुर मार्गावर उभारण्‍यात येणा-या बॉटनिकल गार्डन प्रकल्‍पासाठी राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍था लखनौ यांची तांत्रिक कामात मोलाची मदत होणार आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्‍याबाबतचे प्रशिक्षण हे राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍थेच्‍या सहभागाचा मुख्‍य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बिज संग्रहालय, बोनसाय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया गार्डन आदि घटकांचा समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व गरिब नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्‍ध होणार आहे. - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : जिल्‍हयात चंद्रपूर –बल्‍लारपूर मार्गावर उभारण्‍यात येत असलेल्‍या बॉटनिकल गार्डनमध्‍ये लखनौच्‍या नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिटयुटच्‍या माध्‍यमातुन रोजगारक्षम बाबींसाठी संदर्भात सामंजस्‍य करार करण्‍यात यावा, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पक्‍क्‍या रस्‍त्‍यांवर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे तसेच जिवती तालुक्‍यात वनविभागाशी संबंधीत प्रश्‍नांची सोडवणुक त्‍वरित करावी या मागण्‍यांसदर्भात महाराष्‍टाचे वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीत केंद्रीय पर्यावरण, वन तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत विस्‍तृत चर्चा केली. या विषयांसंदर्भात त्‍वरित सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन डॉ. हर्षवर्धन यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

या चर्चेदरम्‍यान मागण्‍यांबाबत भुमिका विशद करतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, ''चंद्रपूर- बल्‍लारपुर मार्गावर उभारण्‍यात येणा-या बॉटनिकल गार्डन प्रकल्‍पासाठी राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍था लखनौ यांची तांत्रिक कामात मोलाची मदत होणार आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्‍याबाबतचे प्रशिक्षण हे राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍थेच्‍या सहभागाचा मुख्‍य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बिज संग्रहालय, बोनसाय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया गार्डन आदि घटकांचा समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व गरिब नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्‍ध होणार आहे. त्‍याचबरोबर बॉटनिकल गार्डनच्‍या उभारणीत राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍थेची कायमचीच मदत होणार आहे.'' यादृष्‍टीने राष्‍ट्रीय वनस्‍पती संशोधन संस्‍था लखनौ व महाराष्‍ट्राचा वनविभाग यांच्‍यात सामंजस्‍य करार करण्‍यात यावा अशी केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्‍हयातील प्रसिध्‍द ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सन 2016 मध्‍ये सदर व्‍याघ्र प्रकल्‍पात पक्‍क्‍या रस्‍त्‍यांवर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवण्‍यात आले होते. कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश या राज्‍यांमध्‍ये पावसाळी पर्यटन सुरू ठेवण्‍यात आले आहे. त्‍यामुळे ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात सुध्‍दा पावसाळी पर्यटन सुरू ठेवावे असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

चंद्रपूर जिल्‍हयातील जिवती या आदिवासी बहुल तालुक्‍यामध्‍ये वनविभागाशी संबंधीत अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्‍यामुळे विकास प्रक्रियेत अवरोध निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता या प्रश्‍नांची तातडीने सोडवणुक करत तालुक्‍याच्‍या विकास प्रक्रियेला वेग द्यावा अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

या तिनही मागण्‍या विभागामार्फत तपासुन त्‍यांची पुर्तता करण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे आश्‍वासन डॉ. हर्षवर्धन यांनी या चर्चेदरम्‍यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

संबंधित लेख