sudhi mungantiwar blog | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

 सुधीरभाऊ, आबांवर आज स्तुतिसुमने उधळणारे त्यांना पाण्यात पाहत होतेच ना ! 

प्रकाश पाटील 
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही, यासाठी पक्षात आज स्पर्धा सुरू आहेत अशी खंत भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. सांगलीत ज्या आर. आर. आबांच्या कार्यक्रमात ही खंत व्यक्त केली त्याच आबांवर जी आज मंडळी स्तुतिसुमने उधळत आहेत. त्यांनी आबांची मानहानी करण्याबरोबरच काही कमी त्रास दिला नाही हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. 

भाजप हा सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमा असलेला, कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष असे एकेकाळी म्हटले जात असे. त्यालाही आता बरीच वर्षे उलटून गेली. जेव्हा पक्ष लहान असतो. त्याच्या मर्यादा असतात. कार्यकर्ते कमी असतात. तेव्हा तो पक्ष कार्यकर्त्यांना घडवितो. कार्यकर्त्यांना नेते बनवितो. पण, त्याच पक्षाचा विस्तार झाला. त्याच्या कक्षा रुंदावल्या की कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही कसपटा समान वागविले जाते. हे चित्र केवळ भाजपतच नव्हे तर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच पक्षांमध्ये दिसून येते. 

काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे काहीच अस्तित्व नव्हते. मोजकेच नेते होते. त्यामुळे पक्षात प्रत्येकाला मान सन्मान मिळत असे. सुखदु:खात पक्षाचे नेते येत असत. आता तसे चित्र दिसणे किंवा तशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. उलट आपल्याच पक्षातील नेता कसा मोठा होणार नाही. आपल्याला कसा ओव्हरटेक करणार नाही याचीच दक्षता घेतली जाते. शहकाटशह, सुडाचे राजकारण, ज्या नेत्याला ग्लॅमर आहे त्याचा निवडणुकीत पराभव कसा होईल. त्याची कशी जिरविता येईल याची काळजी घेतली जाते. 

राजकीय नेत्यांची संवेदनशीलता संपत चाललेली आहे. पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही, यासाठी पक्षात आज स्पर्धा सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून आपण हे अनुभवत आहे, अशी खंत सुधीरभाऊंनी सांगलीत व्यक्त केली. ती ही आर.आर.आबांच्या स्मारक भूमिपूजन समारंभात. दुसऱ्या पक्षातील माणसाला कशी मदत करायची हे आबांकडून अनुभवले असेही ते म्हणाले. 

आबा हे नेहमीच निवडणूक बाय प्रॉडक्‍ट समजायचे. त्यांना जी खाती मिळाली त्याचे त्यांनी सोने केले. कारण आबा हा माणूस परीस होते हे सर्व खरे असले तरी त्यांनी गरिबीचे चटके सोसले होते. पुढे जिल्हा परिषद, आमदार, मंत्री होतानाच ग्रामस्वच्छता अभियान, डान्सबार बंदी, तंटामुक्ती अभियान यामुळे ते घराघरांत पोचले. जेथे जातील तेथे माणसं मेंढरासारखी त्यांच्या मागे पळायची हा अनुभव महाराष्ट्राने घेतला. गरीब, श्रीमंत, विरोधीबाकावरील मंडळींच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते शक्तीस्थळ होते.आबांची कीर्ती सर्वत्र दुमदुमत होती. आबा, माझे सर्वांत लाडके आहेत असे खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटले होते. आबांचे यश सर्वांनाच दिसते. पण, त्यांनाही राजकारणात त्रास झाला नाही असे नाही. मानहानीबरोबरच निवडणुकीत ते कसे घरी बसतील याची खबरदारी विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नेत्यांनी ते हयात असे पर्यंत घेतली. आज आबांवर जे स्तुतिसुमने उधळत आहेत त्यांनीच आबांना किती त्रास दिला. त्यांना कोंडीत पकडण्याचा कसा प्रयत्न केला याचा पाडा वाचायचा म्हटले तर तो खूप लांबत जाईल. 

आबा एकदा केवळ तीन साडेतीन हजार मतांनी निवडून आले. याची खंत त्यांना आयुष्यभर लागून राहिली होती. तसे त्यांनी अनेक भाषणात ती खंत बोलूनही दाखविली. त्यावेळी छोट्या गावांनी त्यांना तारले होते. आबा आपला माणूस आहे. त्यांनाच मतदान केले पाहिजे ही भावना गोरगरीब मतदारांमध्ये होती.

मी पक्षाचे उमेदवार निवडून यावेत म्हणून राज्यभर दौरे करतो. मात्र माझ्या मतदारसंघात लोक मला साथ देत नाहीत असे त्यांना वाटत होते. पुढे चित्र बदलले हा भाग वेगळा. शेवटच्या श्‍वासापर्यंत ते चांगल्या मतांनी निवडून आले. मात्र त्यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागली. 

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही काही परिणाम झाला नाही. ते विजयी झाले. हा विजय खेचून आणताना त्यांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. निवडणुकीत कोणताही धोका ते स्वीकारायला तयार नव्हेत. पुढे काही महिन्यातच ते आजारी पडले आणि तासगावकरांचाच नव्हे कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड गेला. 

आबा गेल्यानंतर मतदारसंघाला त्यांची खऱ्या अर्थाने किंमत कळली असे म्हणावे लागेल. हे सर्व सांगण्याचे कारण असे की ते अजातशत्रू होते. तरीही राजकारणात आपोआप शत्रू बनत असतात. आबा तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले, दीर्घकाळ गृहमंत्री राहिले. त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणूनही पाहिले जात होते.

कोणताही नेता जसा जसा मोठा होत जातो ना तसे तसे त्याचे शत्रू आपोआप बनत जातात. त्याच्याविषयी असूया निर्माण होते. हे राजकारणात पिढ्यान्‌पिढ्या चालत आले आहे. आबा यशाचे शिखरावर पोचले खरे. पण, तेथे पोचताना त्यांना जो प्रवास करावा लागला होता तो अतिशय खडतर होता हे प्रामाणिकपणे सांगावे लागेल. 

सुधीरभाऊ, आबांचा हा इतिहास सांगण्याचे कारण असे की आपण ज्या पक्षात आहात तो पक्षही काही धुतल्या तांदळाचा राहिला नाही. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात कसा संघर्ष करावा लागला होता ? ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील की काय ? 
असे प्रश्‍नही त्यावेळी विचारले जात होते.

या माणसाने भाजपला प्रत्येकाच्या घरात पोचविले. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला. विविध जातीधर्माचे लोक पक्षात आणले. पक्षाचा विस्तार करण्यासाठी कष्ट घेतले. त्याच मुंडेवर अन्याय झालाच. पक्ष सोडण्याची भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. त्यामुळे राजकीय जीवनात चढउतार हे येतच असतात. प्रत्येक नेत्यांना असे कमी अधिक असे अनुभव येत असतात. 

सुधीरभाऊ, आपला पक्ष ही पूर्वी सारखा राहिला नाही. गुंडांनाही वाजतगाजत भाजपत आणले जात आहे तसा आरोप दुसरेतिसरे कोणी करीत नसून आपल्याच पक्षाची मंडळी करीत आहेत. पक्ष सत्तेवर असल्याने "हौसे नवसे गवसे' सगळे पक्षात आले आहेत. उद्या जर पक्षाची सत्ता गेली तर आयात केलेले नेते उद्या तुमचे नसतील. असतील फक्त आपल्या सारखे नेते. 

अवनीप्रकरणात आपणास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. आपण तेरा माणसाच्या जिवाविषयी जे बोललात ते महत्त्वाचेच होते. आपल्याच पक्षाच्या मंत्री मेनकाबाईंना तुम्ही खडे बोले सुनावले ते बरेच झाले. आज अवनीवरून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणी करीतही असेल.

पुढे यापेक्षाही संकटे आयुष्यात येऊ शकतात. राजकीय किंमतही मोजावी लागेल. त्याला खंबीरपणे तोंड हे द्यायला हवे. राजकारणात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. स्वपक्षाविषयी तुम्हाला अनुभव आला ते बरेच झाले. आबा तर आयुष्यभर असा अनुभव घेत होते. ते केवळ कॅन्सरसमोर ते पराजित झाले. राजकारणात ते अपराजितच राहिले. ते कधी डगमगले नाहीत. तुम्हीही डगमगू नका. हीच अपेक्षा 

संबंधित लेख