Success story of a auto rickshaw driver's daughter | Sarkarnama

रिक्षाचालकाच्या पोटी जन्मलेल्या कल्पनाने फेडले आईवडिलांचे पांग

प्रवीण फुटके
गुरुवार, 9 मे 2019

कल्पनाचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कल्पनाने  हार न मानता मोठ्या संघर्षातून हे यश संपादन केले आहे.

परळी वैजनाथ :  तालुक्‍यातील कनेरवाडी येथील कल्पना वसंत मुंडे यांनी जिद्दीच्या बळावर राज्य लोकसेवा आयोगाच्या कर सहायक परीक्षेत यश संपादन करत, राज्यात मुलींमध्ये प्रथम  येण्याचा मान मिळवला आहे. कल्पनाचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कल्पनाने  हार न मानता मोठ्या संघर्षातून हे यश संपादन केले आहे.

परळी शहराजवळील कनेरवाडी या ग्रामीण भागातील कल्पना मुंडे  शालेय जीवनापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील ऑटोरिक्षाचालक व स्वतः ची थोडी शेती आहे. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले .    पुढे 12 वी नंतर इंजिनिअरिंगला जायचे स्वप्न मनात असताना  कल्पनाने परिस्थितीनुसार येथील वैद्यनाथ महाविद्यालयातून बी.एस्सी. पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असताना खासगी  शिकवणी घेत अर्धवेळ नोकरी केली. नोकरी करत असताना अभ्यासात सातत्य ठेवले. मराठी, इंग्रजीची तयारी करण्यासाठी चार महिने पुण्यात शिकवणी लावली. 

पुढे परीक्षेची तयारी अंबाजोगाई येथील एका खासगी अभ्यासिकेत केली. समांतर आरक्षणाचा फटका बसल्यामुळे वर्ष 2017-18 च्या राज्यसेवा परीक्षेत चांगले गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही. पीएसआय, एसटीआय परीक्षांमध्ये खुल्या गटातील मुलींपेक्षा जास्त गुण असूनही मुख्य परीक्षा देता आली नाही, मात्र कल्पनाने  निराश न होता खुल्या गटातूनच पद मिळेल अशी तयारी करायचे ठरवले. तशी तयारी केली आणि यश मिळाले . 

 कल्पना  नगरपालिकेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे रुजू झाली. एमपीएससीच्या क्‍लार्क परीक्षेत एनटी डी मुलींमध्ये दुसरी आली तर कर सहायक परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली. कल्पनाने आत्मविश्वासाने, जिद्दीने व मेहनतीने हे यश मिळवले आहे. मात्र यावर ती समाधानी नाही तर तिला राज्यसेवा परीक्षेतून पद मिळवायचे आहे. त्यासाठी सध्या ती तयारी करत आहे.

संबंधित लेख