subhash deshmukj replies uddhav | Sarkarnama

उद्धव ठाकरे मित्रपक्षाचे नेते! त्यांनी विचारलं असतं तर माहिती दिली असती : सुभाष देशमुख

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जानेवारी 2019

बीड येथील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याला व्यासपीठावर उभे केले. या शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच नसल्याचा दावा त्यांनी सभेत केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा दावा खोडून काढला. 

मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेजी यांनी बीडच्या सभेत ज्या शेतकर्‍याला उभे केले होते, त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत, असे सहकारमंत्री श्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांचे कर्ज खाते क्रमांक 33817369657 असे आहे. हे स्टेट बँकेतील खाते असून, त्यांनी 2014 मध्ये कर्ज घेतले होते. पुढे हे खाते एनपीए झाले. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले. त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. शासनामार्फत ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे, असेही सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

उद्धवजीजी हे काही विरोधी पक्षनेते नाहीत. ते आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिली असती, तर वरील संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्यापुढे आधीच आम्हाला मांडता आली असती, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख