Subhash Deshmukh criticised bank directors | Sarkarnama

'दरोडेखोर' संचालकांकडूनच कर्जमाफीची मागणी : सहकारमंत्री देशमुख 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जून 2017

अनेक संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतली आहेत. त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती असूनही तो बिचारा काहीच बोलत नाही. अशाप्रकारे संचालकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची चोरी केली आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर "दरोडेखोर' संचालकांनीच कर्ज काढले आहे आणि आता तेच कर्जमाफीची मागणी करत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

सोलापूर : अनेक संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतली आहेत. त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती असूनही तो बिचारा काहीच बोलत नाही. अशाप्रकारे संचालकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची चोरी केली आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर "दरोडेखोर' संचालकांनीच कर्ज काढले आहे आणि आता तेच कर्जमाफीची मागणी करत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

शिवार संवाद अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आठ-दहा गावांमध्ये त्यांनी आज दौरा केला. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. 

देशमुख म्हणाले, ""शासन कर्जमाफीबाबत सकारात्मक आहे. त्याचबरोबर खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी मुख्यमंत्र्यांची आग्रहाची भूमिका आहे. भविष्यात कर्जमाफीबाबत निश्‍चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल.'' ते म्हणाले, यापूर्वी 2007-08 मध्ये कर्जमाफी झाली होती. त्यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ही शेवटची कर्जमाफी असल्याचे सांगितले होते. तरीही आता पुन्हा कर्जमाफी मागितली जात आहे. 2007-08 ला झालेल्या कर्जमाफीमध्ये पुढाऱ्यांची कर्जे माफ झाल्याचे शेतकरी आताही स्पष्टपणे बोलत आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे कर्जमाफीबाबत चांगला निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, पाथरीचे माजी सरपंच श्रीमंत बंडगर, सतीश लामकाने उपस्थित होते. 

संबंधित लेख