subhash deshmukh about laon process | Sarkarnama

मराठा तरुणांच्या कर्जाची हमी शासन घेणार : देशमुख 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपी देण्याबाबत नुकतीच पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीत येत्या पाच सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे न झाल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल. 
-सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

सोलापूर : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने मराठा तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची हमी शासनाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणांना उद्योगांसाठी विनातारण कर्ज दिले जाणार आहे. याबाबतचा शासन आदेश आठवड्यात निघेल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यभर मराठा समाजाची आंदोलने होत आहेत. समाजाने आंदोलन केले पाहिजे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. मुख्यमंत्री सगळ्यांच्या सोबत चर्चा करायला तयार आहेत. समाजाने आंदोलने शांततेत करण्याचे आवाहनही सहकारमंत्री देशमुख यांनी केले. 
ज्यांनी जाणूनबुजून नुकसान केले आहे, त्या समाजकंटकांवर पोलिस कारवाई करतील. शिक्षण संस्थांना 50 टक्के फी शासन देणार आहे. फी च्या कारणावरून कुणाही विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखू नये, अशा सूचनाही शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत या महामंडळाकडे 12 हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. आलेल्या अर्जांच्या तुलनेत कर्ज वाटप करण्यात आम्हाला अपयश आल्याची कबुलीही सहकारमंत्र्यांनी दिली. मात्र, यापुढे विनातारण कर्ज देण्यात येणार असल्याने ही संख्याही निश्‍चितच वाढेल, असेही त्यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख