शेतकरी संपाचा केंद्रबिंदू ठरणार आता नाशिक

नाशिकच्या आंदोलकांच्या भूमिकेला राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीनी पाठिंबा दर्शवित, सर्वानुमताने निर्णय घेऊ असे कळविल्याने अखेर उद्या (ता.4) दुपारी चारला पंचवटीतील बाजार समितीत संपाबाबत सहमतीने निर्णय घेण्याचे ठरले.
शेतकरी संपाचा केंद्रबिंदू ठरणार आता नाशिक

नाशिक : शेतकऱ्यांच्या संपावर मुंबईतील निर्णयावर समाधानी नसलेले शेतकरी व त्यांच्या अनेक संघटना संपाबाबत ठाम आहेत. संप सुरुच ठेवण्यासाठी या संघटना ठाम आहेत. उद्या (ता.4) याबाबत बैठक होणार आहे. शेतकरी संपाचे केंद्र यापुढे नाशिक असेल. नाशिकला बाजार समितीत बैठक होउन त्यात, संपाबाबत सर्व सहमतीने उद्या (ता.4) दुपारी चारला एकमताने निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारीसाठी तयार नसलेल्या राज्यातील सर्व शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी उद्या नाशिकला दाखल होत आहे. त्याच वेळी दुसरीकडे मुख्यमंत्र्याचे दूत म्हणून, पालकमंत्री गिरीश महाजन हेही मध्यस्थीसाठी नाशिकला दाखल झाले आहेत. 

आंदोलनकर्ते शेतकरी आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यातील दिवसभरातील घडामोडी बघता, 1978 प्रमाणे राज्याच्या शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू पून्हा नाशिककडे वळल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेत संप मागे घेतल्याचे कळताच, सकाळपासून नाशिकला शेतकरी संपाच्या घडामोडी गतीमान झाल्या. पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही. अशी ठाम भूमिका असलेले शेतकरी पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. त्याचवेळी काही व्यापारी त्यांचा माल विक्री करीत असल्याचे लक्षात येतांच, आंदोलकांनी त्यांना विरोध केला. संप मागे घेतला नसतांना, विक्री कशी ? असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी व्यापाऱ्यांना विरोध केला. 

अशातच विक्रीला आणलेले डांगर काही आंदोलकांनी फेकून दिले. मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संप मागे न घेण्याच्या घोषणा देत आंदोलकांची बैठक झाली. बैठकीला जि.प. सदस्या अमृता पवार, चंद्रकांत बनकर, राजू देसले,हंसराज वडघुले, वसंत ढिकले आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत, संप कायम ठेवण्याचा निर्णय झाला. नाशिकच्या आंदोलकांच्या भूमिकेला राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीनी पाठिंबा दर्शवित, सर्वानुमताने निर्णय घेऊ असे कळविल्याने अखेर उद्या (ता.4) दुपारी चारला पंचवटीतील बाजार समितीत सहमतीने निर्णय घेण्याचे ठरले. 
संपाचे केंद्र पुण्यतांब्याकडून नाशिककडे सरकत असल्याचे लक्षात येताच, दुपारी आंदोलकांशी चर्चा करुन मध्यस्थीची जबाबदारी सोपविलेले मुख्यमंत्र्याचे दूत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हेही नाशिकच्या दिशेने निघाले. 
शेतीमालासाठी "सुरक्षित कॅरिडोर' 
संपाच्या उद्रेकात सुरक्षित शेतीमाल वाहातूकीसाठी जिल्ह्यात "सुरक्षित कॉरिडोर' तयार करुन 194 ट्रक भाजीपाला नाशिकमधून रवाना झाले. हिंसक कारवायात बघ्याची भूमिका घेतली म्हणून 4 पोलिसांना निलंबित केले आहे. प्रशासनाचा संपाला विरोध नाही, मात्र संपाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न मात्र खपवून घेणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी व पोलिस अधिक्षक अकुश शिंदे यांनी इशारा दिला. 

दोन दिवसांपासून सौम्य भूमिकेतील जिल्हा यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी संप मिटल्याचे जाहीर केल्यापासून कडक भूमिकेत आहे. जिल्हयात मालवाहतूक ठप्प पडू नये म्हणून, शेतमाल वाहतूकीसाठी "सुरक्षित कॉरिडॉर' तयार केला आहे. नाशिकमधून शेतीमाल वाहातूक ठप्प पडल्याने मुंबईच्या बाजारात परिणाम झाल्याने प्रशासनाने मध्यरात्री बैठका घेत, जिल्हयातून 194 ट्रक पोलीस संरक्षणात रवाना केले. त्यात, 65 भाजीपाल्याचे तर इतर कांद्याचे याप्रमाणे साधारण 194 ट्रक टॅकरची वाहातूक झाली. याशिवाय नाशिक शहरासाठी 11 दूधाचे टॅकर दाखल झाले. शेतमाल पुरवठा सुरळित होण्यासाठी रविवारीही बाजार समित्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. जिल्हाधिकाऱ्यांनी आज बाजार समित्यांच्या पदाधिकारी, व्यापारी , मालवाहतूकदारांशी चर्चा करुन मालवाहातूकीचे नियोजन केले. 

संपाला हिंसक वळण देण्याच्या प्रयत्नाबद्दल 10 ते 15 गुन्हे दाखल केले असून 150 जणांना ताब्यात घेतल्याचे पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले की पिंपळगाव जलाल व उंदरवाडी शिवारातील सुमारे 42 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. वडनेर खाकुर्डी येथे बटाटयाचा ट्रक लुटल्याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतले. अनेकांच्या घरातून बटाटयाची पोते जप्त केले. आंदोलन थोपविण्यात कुचकामी ठरल्यास किंवा कर्तव्यात कसुर केल्यास पोलीसांना निलंबित केले जाणार आहे. दूधाचा टॅंकर जात असतांना टॅंकर अडवून टॅंकर फोडण्याचा प्रयत्न होत असतांना, पोलीसांनी बध्याची भुमिका घेतल्याने आतातपर्यंत 4 पोलीसांना निलंबित केले आहे. पिंपळगाव जलाल येथील पोलीस पाटलांना निलंबित केले असून ज्या गावात हिंसक कारवाया होतील. तेथील पोलिस पाटलांवरही कारवाई केली जाणार आहे. 

कांदा व्यापाऱ्यांना संरक्षण 
नाशिक जिल्हयातून इतरत्र कांदा पाठविला जातो. नाशिकहून मुंबईला दररोज सुमारे 300 ट्रक कांदा जातो. मात्र दोन दिवसात एकही ट्रक मुंबईकडे गेलेला नाही. त्यामुळे रात्री एकला लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांची बैठक घेत कांदा वाहतूकिसाठी पोलीस सरंक्षण देण्याचे प्रशासनाने आश्‍वासन दिले जिल्हयातील बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणावर कांदा पडून असून हा कांदा निर्यातीसाठी आता व्यापारयांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

बंदोबस्त पुरवला जाईल 
शेतीमाल वाहातूकीत मदत लागत असल्यास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस अधिक्षक किंवा थेट वैयक्तीत माझ्याशी संपर्क साधू शकता. आवश्‍यक तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. शेतकरी आणि नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन बी यांनी सांगितले. 

घटनाक्रम 
सोशल मिडियावर संप माघारीच्या बातम्या धडकल्या 
संप कायम ठेवण्यासाठी आंदोलक शेतकरी पंचवटीत 
भाजीविक्रीला आलेल्या व्यापाऱ्यांचा भाज्या फेकल्या 
आंदोलकांनी घेतला संप असाच कायम ठेवण्याचा निर्णय 
राज्यातील संघटनांकडून नाशिकच्या निर्णयाला समर्थन 
मुख्यमंत्र्याचे दूत पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com