stop stunts and work for people : Shivendrsinhraje | Sarkarnama

उदयनराजे, स्टंटबाजी करण्यापेक्षा कामे करा : शिवेंद्रसिंहराजे

उमेश भांबरे
रविवार, 16 सप्टेंबर 2018

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर हल्लाबोल केला. शेलकी विशेषणे वापरत त्यांनी उदयनराजेंवर टीका केली. तेरावा वंशज असल्याचे दाखवत जनतेची गळचेपी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच खासदारांना स्टंटबाजी थांबविण्याचा सल्ला दिला.  

सातारा : तुम्ही खासदार आहात, तुम्ही केंद्रात प्रश्‍न मांडा केवळ स्टंटबाजी करण्यापेक्षा खासदारांनी लोकांच्या भावना समजून निर्णय करून घ्यावेत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रश्‍न त्यांनीच सोडवायला हवेत. केवळ गणेश भक्तांत संघर्ष निर्माण करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना शोभणारे नाही, असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे यांना लगावला आहे. 

सध्या खासदारांच्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांचे लक्ष कमिशनवर व खासदारांचे लक्ष स्वत:च्या निवडणुकीवर आहे, असा टोला लगावून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खासदारांना लोकसभा लढवायची आहे. तसेच साशा कंपनीकडून किती पदरात पडतयं हेही पहायचे आहे. या कंपनीकडून तुला काय मिळाले आणि मला काय मिळाले, यावरच त्यांचे व त्यांच्या नगरसेवकांचे लक्ष आहे. कुणाला कमी व कुणाला जास्त कमिशन दिले यावरच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक टपलेले असतात.

सातारा शहरात अनेक स्थानिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. स्वाईन फ्लू, खड्डे भरण्याकडे पालिकेचे दूर्लक्ष झालेले आहे. कराचे स्वत: आणि दुसऱ्यावर दोष द्यायचा हे चालले आहे. गेली 40 वर्षात साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्न कधीही निर्माण झाला नव्हता. पण पालिकेत खासदारांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तुघलघी कारभार सुरू झाला आहे. त्यातूनच सातारकर व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.
 

वाचा आधीची बातमी- मी महाराज, तेरावा वंशज असे दाखवून उदयनराजेंकडून गळचेपी : शिवेंद्रसिंहराजेंची तोफ

संबंधित लेख