stop koyna water | Sarkarnama

कोयनेचे पाणी बंद कर ! कर्नाटकची मस्ती उतरवा ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

आमच्या कोयनेचे पाणी घेऊन कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर रुबाब दाखवत आहे. त्यांना आलेली मस्ती उतरविण्यासाठी कर्नाटकात जाणारे कोयनेचे पाणी भाजप सरकारने तातडीने बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. 

सातारा : कर्नाटकात "जय महाराष्ट्र' म्हणण्यास बंदी आणण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आमच्या कोयनेचे पाणी घेऊन कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर रुबाब दाखवत आहे. त्यांना आलेली मस्ती उतरविण्यासाठी कर्नाटकात जाणारे कोयनेचे पाणी भाजप सरकारने तातडीने बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. 

कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी "जय महाराष्ट्र' म्हणायचे नाही, असा अजब फतवा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी काढला आहे. "जय महाराष्ट्र' म्हटल्यास लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेग यांच्या या भूमिकेमुळे सीमा भागात संतापाची लाट पसरली आहे. 

या निर्णयाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर निषेध करत कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, कर्नाटक सरकारला मस्ती आली आहे. त्यांनी "जय महाराष्ट्र' म्हणण्यावर बंदी घातली आहे. पण कोयनेचे पाणी घेऊन महाराष्ट्रावर रुबाब दाखविण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे. कर्नाटकला जाणारे सर्व पाणी अडविले तर त्यांची मस्ती कमी होईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिके करपली तरी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकार कर्नाटकला कोयनेतून पाणी सोडत आहे. आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक महत्त्वाचे वाटत आहे. त्यांना तेथील निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी हा त्यांचा खटाटोप आहे. थोडा स्वाभिमान ठेवून भाजप सरकारने कोयनेचे पाणी बंद करावे, कर्नाटक सरकार आपोआप वठणीवर येईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.  

संबंधित लेख