steback to narayan rane | Sarkarnama

ऑपरेशन सुरु : कॉंग्रेसचा नारायण राणेंना जोरदार धक्का ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेस संघटनेतील वर्चस्वाला प्रदेश कॉंग्रेसने दिलेला हा धक्का मानला जात आहे. विद्यमान कॉंग्रेस कार्यकारिणीत बहुसंख्य राणेसमर्थक पदाधिकाऱ्यांचा भरणा होता. 

सावंतवाडी : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेस संघटनेतील वर्चस्वाला प्रदेश कॉंग्रेसने दिलेला हा धक्का मानला जात आहे. विद्यमान कॉंग्रेस कार्यकारिणीत बहुसंख्य राणेसमर्थक पदाधिकाऱ्यांचा भरणा होता. 

गेले काही महिने श्री. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यातच राणे आणि प्रदेश कॉंग्रेस यांच्यातील दुरावा कायम आहे. वेळोवेळी राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी तर चव्हाण यांच्यावर थेट टीकेची तोफ डागली होती. इतके होवूनही प्रदेश कॉंग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 

गेल्या आठवड्यात कॉंग्रेसने जिल्ह्यात माजी खासदार हुसेन दलवाई, राजन भोसले हे निरीक्षक पाठविले. त्यांनी कॉंग्रेसची बैठक बोलावली; मात्र याला राणेंना आमंत्रित केले नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या राणेंनी ओसरगाव येथे त्याच दिवशी कॉंग्रेसची वेगळी बैठक बोलावली. निरीक्षकांच्या उपस्थितीत सावंतवाडीत झालेल्या बैठकीला राणे समर्थक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत श्री. दलवाई यांच्यासह इतर निरीक्षकांना राणेंना न बोलावण्याबाबत जाब विचारला. यानंतर निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशकडे सुपूर्द केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्याची व नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेश कॉंग्रेसने प्रेसनोट काढून केली.

प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या नियुक्‍त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यात नमूद आहे. 

या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस कमिट्या बरखास्त झाल्या आहेत. सध्या जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिट्यांवर कार्यरत बहुसंख्य पदाधिकारी राणेंचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसकडून या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राणेंच्या कॉंग्रेसमधील संघटनात्मक फळीसाठी धक्कादायक म्हणावा लागेल. 

संबंधित लेख