राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांना नागरिकांची प्रतीक्षा

राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांना नागरिकांची प्रतीक्षा

मुंबई : राज्यातील कामकाज व महत्त्वाचे निर्णय मंत्रालयातच होत असल्यामुळे मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोंढा मंत्र्यांच्या भेटीसाठी दररोज मोठ्या संख्येने येत असतो. परंतु हा लोंढा केवळ कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयाजवळच विसावत असल्याने राज्य मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये नेहमीच शुकशुकाट पहावयास मिळतो. मंगळवारी कॅबिनेटची मीटिंग असतानाही हेच चित्र पहावयास मिळत असल्याने राज्य मंत्र्यांची कार्यालये नागरिकांची भेटीसाठी व्याकूळ झाल्याचे पहावयास दिसून येत आहे. 

मंत्रालयाचा आढावा घेताना कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यामध्ये नागरिकांच्या वर्दळीबाबत कमालीचा फरक पहावयास मिळतो. मंत्रालयात फक्त कॅबिनेट मिटींगच्या दिवशीच जत्रेसारखे वातावरण पहावयास मिळते. कॅबिनेटच्या मिटींगचा अपवाद वगळल्यास अन्य दिवशी कॅबिनेट मंत्रीही त्यांच्या कार्यालयात फारसे फिरकत नसल्याचे पहावयास मिळते. 


दोन-तीन राज्य मंत्र्यांच्या कार्यालयाचा अपवाद वगळता अन्य राज्य मंत्र्यांच्या कार्यालयात त्यांचे कर्मचारी व ओएस,पीएस सोडता अन्य कोणीही पहावयास मिळत नाही. अनेक राज्यमंत्री कॅबिनेट मिटींगच्या दिवशीही मंत्रालयाकडे फिरकत नसल्याचे दिसून येते. त्यांच्या कार्यालयात याबाबत चौकशी केली असता, कॅबिनेटच्या मिटींगला राज्य मंत्र्यांचे काम नसते. तसेच आमच्या खात्याचा कॅबिनेटच्या मिटींगला विषयच नव्हता अशी थातूरमातूर उत्तरे संबंधितांकडून दिली जातात. एकतर राज्य मंत्र्यांच्या कार्यालयात कामे घेऊन येणारे नागरिक तर फिरकतच नाहीत, पण त्या त्या खात्याचे राज्य मंत्रीही आपल्या कार्यालयाकडे फारसे फिरकत नसल्याचे पहावयास मिळते. 

पूर्वी किमान मंत्रिपद आहे म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचा मान तरी मिळायचा, पण आता गेल्या काही दिवसापासून लाल दिवाही गेल्याने मंत्र्यांमधील बैचेनी पहावयास मिळते. कार्यालयात कामे घेऊन नागरिक फिरकत नाही, ज्या वाहनातून फिरतो, त्या वाहनावर लाल दिवाही नाही, राज्य मंत्रीही त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाकडे फिरकत नसल्याने राज्य मंत्री मंडळातील राज्यमंत्रिपद नावापुरते राहिले असल्याचे मंत्रालयीन अधिकारी वर्गाकडून उपहासाने बोलले जाऊ लागले आहे. 

पूर्वीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या आघाडी सरकारच्या काळात आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस मंत्री राज्यातील नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध व्हायचे, पण आता कॅबिनेटच्या दिवशी शंभर टक्के हजेरी लावणारे मंत्री अन्य दिवशी त्यांच्या कार्यालयात सहजासहजी उपलब्ध होत नसल्याची नाराजी कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com