सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी महागाई भत्त्याच्या थकबाकीने तर नववर्षाची पहाट सातव्या वेतन आयोगाने 

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना जाहीर केला.
Mungantiwar
Mungantiwar

मुंबई  : राज्य सरकारी  सरकारी कर्मचाऱ्यांची नववर्षाची पहाट सातव्या वेतन आयोगाने होणार आहे  . वेतन आयोग लागू करण्यासाठी एक जानेवारी 2019 ची नवी मुदत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केला.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिवाळीपूर्वी लागू केला जाईल, असे मुनगंटीवार आधी म्हणाले होते. वेतन आयोगाचा लाभ एक  जानेवारी 2016 या निर्धारित तारखेपासूनच देण्यात येणार आहे. मात्र सहाव्या वेतन आयोगात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक त्रुटी होत्या. त्यावर के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत आहे . त्या त्रुटी दूर करून नव्या वर्षात वसातवा वेतन आयोग लागू होईल , असे  मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २०१८ पासून १३९ वरून १४२  टक्के असा सुधारित करण्यात आला असून १ ऑक्टोबर २०१८ पासून या महागाई भत्त्याचा लाभ निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनात देण्याचे आदेश यापूर्वीच जारी करण्यात आले होते. आता या ३ टक्क्यांची १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतची नऊ महिन्याची थकबाकीदेखील ऑक्टोबर २०१८च्या निवृत्ती/ कुटुंबनिवृत्तीवेतनात देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे . 

श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले , " ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांमधील निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू होईल. याबरोबरच हा निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू होईल."


"ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये किंवा स्वायत्त संस्थांमध्ये किंवा स्थानिक संस्थांमध्ये स्वत: ला सामावून घेत ठोक रक्कम स्वीकारली आहे व जे निवृत्तीवेतनाच्या १/३ (एक तृतीयांश) इतका अंशराशीकृत भाग पुन:स्थापित करण्यासाठी १५ नोव्हेंबर १९९९ नुसार अंशराशीकृत रकमेच्या सुधारणेस पात्र ठरले आहेत अशा कर्मचाऱ्यांनाही ९ एप्रिल २००१ च्या तरतुदीनुसार त्यांच्या पूर्ण निवृत्तीवेतनावर नमूद केलेल्या दिनांकापासून विहित दराने या महागाई भत्त्याची थकबाकी अनुज्ञेय राहील. ज्यांना या निर्णयाची अधिक माहिती हवी आहे, त्यांनी वित्त विभागाचा  २९ ऑक्टोबर २०१८ रोजीचा यासंबंधीचा शासन निर्णय पाहावा,' असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.


असुधारित वेतनश्रेणीत निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २०१८ पासून २६८ टक्क्यांहून २७४  असा सुधारित करण्यात आला आहे तो  १ ऑक्टोबर २०१८ पासून रोखीने देण्याचे आदेशही वित्त विभागाने दिले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णयही वित्त विभागाने   २८ ऑक्टोबर २०१८रोजी जारी केला आहे, असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com