S.T. depots merger to reduce losses | Sarkarnama

तोट्यामुळे एसटी आगारांचे विलीनीकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 मे 2017

 महामंडळाने समिती नेमून मोठ्या प्रमाणात तोटा होत असलेल्या आगारांचा अभ्यास केला जात आहे. 250 पैकी 193 आगारे तोट्यात आहेत.समितीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकींनंतर 27 एप्रिलला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीत समितीला आगारांचा पुन्हा आढावा घेण्यास सांगण्यात आले. 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेली आगारे बंद केली जाणार आहेत.

मुंबई : एसटी महामंडळाचे होणारे नुकसान आणि तोटा कमी करण्यासाठी महामंडळाने एसटी आगारांचेही एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबवले आहे. सुसूत्रीकरणात एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 महामंडळाने समिती नेमून मोठ्या प्रमाणात तोटा होत असलेल्या आगारांचा अभ्यास केला जात आहे. 250 पैकी 193 आगारे तोट्यात आहेत.समितीच्या आतापर्यंत झालेल्या बैठकींनंतर 27 एप्रिलला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा झाली.

या बैठकीत समितीला आगारांचा पुन्हा आढावा घेण्यास सांगण्यात आले. 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेली आगारे बंद केली जाणार आहेत.

प्रत्येक तालुक्‍यात एक आगार याप्रमाणे 1990 पासून राज्यातील एसटी आगारांची संख्या वाढवण्यात आली. सध्या महामंडळाची राज्यात 250 आगारे आहेत.

आगारांची संख्या वाढत गेल्याने मनुष्यबळही वाढले आणि त्याचा परिणाम म्हणून देखभाल व दुरुस्तीचा खर्चही वाढत गेला. त्यामुळे अनेक आगारे तोट्यात असल्याचे कारण पुढे करत महामंडळ एसटी फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करू लागले आहे.

एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने अशा फेऱ्या कमी करण्यावर महामंडळ काही महिन्यांपासून भर देत आहे. फेऱ्या कमी केल्या जात असतानाच आगारांचा खर्च कमी करण्यासाठी आगारांचे विलीनीकरण करण्याचा निर्णयही एसटीने घेतला. 

एक आगार दुसऱ्या आगारात विलीन करताना त्या आगारातील देखभाल व दुरुस्तीची कामे दुसऱ्या आगारात केली जातील. एसटी फेऱ्यांतही बदल होतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि तोटाही कमी कसा करावा? याचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. 

टॅग्स

संबंधित लेख