घरे बांधण्याचा पत्ता नाही, मात्र  खोल्या खालीसाठी बिल्डरची घाई 

घरे बांधण्याचा पत्ता नाही, मात्र  खोल्या खालीसाठी बिल्डरची घाई 

मुंबई : विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमान नगरच्या एसआरए प्रकल्पात बिल्डर-म्हाडा आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांकडून घालण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांच्या पात्र-अपात्रेचा मोठा वाद आर्थिक गैरप्रकाराला कारणीभूत ठरला असल्याचीबाब समोर आली आहे. घरे बांधणे राहिले दूरच मात्र आहे त्या खोल्या खाली करण्यासाठी बिल्डरची घाई सुरू असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. 

या प्रकल्पात असलेल्या 15 गृहनिर्माण सोसायट्यांच्या मिळून बनलेल्या हनुमान नगर विकास मंडळ या फेडरेशनमध्ये समाविष्ट झालेल्या प्रकल्पात अनेक झोपडपट्टीधारकांना अपात्र करत त्यांना बिल्डरकडून डावलेले गेल्यानेच या प्रकल्पाला स्थानिकातील बहुतांश झोपडपट्टीधारकांचा विरोध होत आहे. या विरोधाला कमी करण्यासाठीच मोठे आर्थिक व्यवहार बिल्डर आणि संबंधित यंत्रणेकडून केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. 

दुसरीकडे मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प ओंकार बिल्डरकडून सुरू केला जात असतानाही अद्याप कोणत्या इमारतींचे काम का सुरू केले जात नाही, केवळ झोपड्या खाली करण्याची घाई का केली जात आहे? असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील 21 वर्षांपासून या प्रकल्पासाठी वेळोवेळी बिल्डर बदलले जात असल्याने स्थानिकांना आपला एसआरए योजनेत विकास होईल का, असा प्रश्‍नही सतावत आहे. 

हनुमान नगर येथील एसआरए हा प्रकल्प 21 वर्षापूर्वी सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यावेळी 31 जानेवारी 1996 रोजी मे. आशापुरा गृहनिर्माण प्रा.लि. या बिल्डरकडून तो प्रस्ताव होता. या प्रस्तावाचा 8 जून 1996 रोजी एलआयओ मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच पुनर्वसन आराखडे मंजूर करण्यात आले होते. मात्र या बिल्डरला बांधकाम परवानगी मिळाली नसतानाच या प्रकल्पासाठी मे. लेक व्ह्यू डेव्हलपर्सची नियुक्‍ती करावी यासाठी वास्तुविशारद यांनी प्रस्ताव सादर केला होता. आता येथे ओंकार बिल्डरकडून 15 सोसायट्यांच्या झोपड्या खाली करून घेण्याचे काम सुरू असून विकास कामाचा मात्र अद्यापही लवलेश नाही. 

हनुमान नगर एसआरए प्रकल्पात 15 सोसायट्यांचे मिळून एकुण 64,299,67 चौ.मी. इतके क्षेत्रफळ आहे. यात 1 हजार 639 झोपडीधारकांपैकी 1 हजार 488 झोपडीधारक पात्र ठरविण्यात आले होते. तर उर्वरित 151 जणांना वगळण्यात आले होते. यात 1 हजार 431 निवासी, 13 निवासी-अनिवासी संयुक्‍त, 36 अनिवासी संकुल, 7 धार्मिक स्थळे आणि एक तबेला यांचा समावेश होता. मात्र मागील काही वर्षांत बिल्डर, म्हाडाचे अधिकारी, एसआरएचे अधिकारी यांनी केलेल्या गोंधळामुळे या प्रकल्पात 15 सोसायट्यांतील तब्बल 664 झोपडीधारकांना अपात्र ठरविण्यात आल्याने यावर वाद निर्माण झाला होता. त्याच वादाला पांघरून घालण्यासाठी बिल्डरांकडून सोसायटीच्या प्रमुखांसोबतच इतर संबंधितांना मॅनेज करण्याचे प्रकार घडले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com