sp yashwi yadav aurangabad | Sarkarnama

दंगा रोखण्यास मदत आणि गुन्हेगारांना लोकेट करणारा "चिलीड्रोन प्रकल्प' !

जगदीश पानसरे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम, उत्सव, धार्मिक मिरवणूका अशा वेळी नागरिकांची गर्दी हजारोंनी असते. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर उपद्रव करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना रोखणे आणि कायदेशीर कारवाई करणे यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवणे शक्‍य होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण देखील घटते. ड्रोनमध्ये चिलीड्रोन हा एक नवा प्रकार यशस्वी यादव यांनी शोधला. 

औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी "चिलीड्रोन' चा अभिनव प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. केवळ पोलीस दलातील मनुष्यबळाच्या आधारावर शहरातील गुन्हेगारी व वाहतुकीचा डोलारा सांभाळणे शक्‍य नसल्याचे लक्षात आल्यामुळे यशस्वी यादव यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत नागरिकांना सुरक्षितता पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच एक भाग म्हणून त्यांच्या "चिलीड्रोन' प्रकल्पाकंडे पाहिले जाते. 

बेशिस्त वाहतूक व अपघातांमध्ये जाणारे सामान्यांचे बळी यावर ठोस उपाय करणे गरजेचे असल्याने यशस्वी यादव यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला तेव्हाच या बाबींना प्राधान्य द्यायचे ठरवले होते. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या काळात सुरु झाला होता. त्यांच्या बदलीनंतर आयुक्त म्हणून आलेल्या यशस्वी यादव यांनी त्याला अधिक गती दिली. सीसीटीव्हींची संख्या वाढवण्या बरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास दंगेखोरांना पांगवण्यासाठी यादव यांनी "चिलीड्रोन' ची मदत घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. 

काय आहे चिलीड्रोन 
चिलीड्रोनची संकल्पना औरंगाबाद शहरात राबवण्याचा विचार पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी केला. उत्तर प्रदेशातून औरंगाबादला बदली होऊन आलेल्या यादव यांना जमावाला नियंत्रणात आणण्याचा तसा बराच अनुभव होता. महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम, उत्सव, धार्मिक मिरवणूका अशा वेळी नागरिकांची गर्दी हजारोंनी असते. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर उपद्रव करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना रोखणे आणि कायदेशीर कारवाई करणे यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवणे शक्‍य होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण देखील घटते. ड्रोनमध्ये चिलीड्रोन हा एक नवा प्रकार यशस्वी यादव यांनी शोधला. चिलीड्रोनद्वारे जमावावर केवळ नजरच ठेवता येत नाही, तर दंगा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चिलीड्रोनच्या सहाय्याने हवेतूनच मिरचीपुडीचा मारा करणे शक्‍य झाले आहे. मिरचीपूडी प्रमाणेच दंगा करून फरार झालेल्या आरोपींचा पोलीसांना शोध घेता यावा यासाठी ड्रोन मधून विशिष्ट रंगाचा मारा देखील करता येऊ शकतो. हा रंग पक्का आणि लवकर न निघणारा असल्यामुळे ड्रोन फुटेजच्या मदतीने पोलीस दंगेखोरांपर्यत पोहचू शकतील. 

चिलीड्रोन राज्यात लागू होण्याची शक्‍यता 
औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतील विशेष पोलिस अधिकारी व चिलीड्रोन प्रकल्प उपक्रमाचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाने मागवून घेतला आहे. त्यामुळे भविष्यात पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांचा हा प्रकल्प राज्यात इतर ठिकाणी लागू होण्याची शक्‍यता आहे. चिली ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्राचा वापर सुरक्षेसाठी केल्यानंतर या उपक्रमाला जिल्हा विकास निधीतून नावीन्यपूर्ण योजनेंर्तगत निधी उपलब्ध झाला आहे. या उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले. कॅमेऱ्यांची टेहळणी व सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तालयात चिली ड्रोन युनिट स्थापन करण्यात आले आहे. 

पेटेंटसाठी प्रयत्न 
चिलीड्रोन तंत्राच्या पेटंटसाठी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनरल कंट्रोलर ऑफ पेटंट कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. यात बेकायदेशीर जमावाचे नियंत्रण करण्यासाठी चिलीड्रोन कॅमेऱ्याच्या वापराचे तंत्र पेटंट म्हणून नोंदणीकृत करण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण उपकरण अथवा तंत्राचा शोध लावणाऱ्या व्यक्तीला बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त होतात. पेटंट झालेल्या तंत्राचा वापर करणाऱ्या इतरांना उपकरण तयार करणाऱ्या व्यक्तीला बौद्धिक संपदा अधिकाराबाबत रॉयल्टी द्यावी लागते. त्यामुळे चिली ड्रोनचे पेटेंट मिळाल्यास अन्य ठिकाणी हे तंत्र वापरण्यापूर्वी औरंगाबाद शहर पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 
 

संबंधित लेख