SP संदीप पाटलांचा दणका : एमआयडीसी गुंडांवर खंडणीसह दरोड्याचा गुन्हा

SP संदीप पाटलांचा दणका : एमआयडीसी गुंडांवर खंडणीसह दरोड्याचा गुन्हा

शिक्रापूर :  औद्योगिक क्षेत्रातील दादागिरी मोडून काढणार असे चारच दिवसांपूर्वी म्हणालेल्या पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी अखेर याची चुणूक कोंढापुरी (ता.शिरूर) येथील सहा जणांना दाखविली आहे. जेवणाच्या कंत्राटावरुन महिन्याला वीस हजार मागणा-या या सहाही आरोपींवर खंडणीसह दरोड्याचाही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

औद्योगिक ठेक्यावरुन दरोड्याचा गुन्हा दाखल होण्याची शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील ही पहिलीच घटना असून या पुढील काळात अशा छोट्या तक्रारींच्या बाबतीतही थेटपणे गुन्हे दाखल करुन औद्योगिक गुंडगिरी नेस्तनाबूत करण्याचा इरादा पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी व्यक्त केला. 

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी. कोंढापूरी (ता.शिरूर) येथील किर्लोस्कर कंपनीत जेवण पूरविणारे सदानंद शेट्टी या कंत्राटदारांचे व्यवस्थापक मनोज लायसे हे सोमवारी (दि.१०) रात्री साडेनऊच्या सुमारास कंपनीत जेवण पोहच करुन परत घरी येत असताना त्यांना अक्षय रोकडे, भुषण गायकवाड, सागर माघाडे, आकाश दंडवते (सर्व रा.कोंढापूरी, ता.शिरूर) व इतर दोघांनी अडवून जेवणाचे कंत्राट चालू ठेवायचे असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये दे नाही तर आम्ही तुझे हात-पाय तोडू असे म्हणून सर्वजण निघून गेले.

यावर आज पुन्हा सकाळी अकराचे सुमारास मनोज लायसे हे जेवण घेवून कंपनीत जात असताना पुन्हा वरील आरोपींनी त्यांना पुणे-नगर रस्त्यावरील मास्टर हॅंडर कंपनीजवळ अडविले व गाडीतले जेवण व जेवणाचे डबे असा एकुण साडेबारा हजाराचा मुद्देमाल आपल्या गाडीत टाकून, फिर्यादी लायसे व त्याचा सहकारी सुलतान व नंदु (पूर्ण नाव माहिती नाही) काढून घेवून मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच वीस हजारांची लगेच मागणीही केली. सदर तक्रारीवरुन भूषण गायकवाड, अक्षय रोकडे, सागर माघाडे, आकाश दंडवते व इतर दोघे असे एकुण सहा जणांवर खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.  

चारच दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सणसवाडीत पुणे-नगर रस्त्यावरील सर्व उद्योजकांची एक बैठक घेवून तुम्ही फक्त तक्रारी करा, बाकी आम्ही पाहून घेतो असे सांगत औद्योगिक क्षेत्रातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना औद्योगिक क्षेत्राबाबत संवेदनशील राहण्याची सूचना केली होती. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी आलेल्या तक्रारीवरुन थेट खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. 

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत औद्योगिक ठेक्यावरुन थेट दरोड्याचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असून या पुढील काळात आपल्या हद्दीत औद्योगिक गुंडांसाठी हा सूचक इशारा असल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com