सौरभ राव यांनी पुणे पालिकेत पहिल्याच बैठकीत घेतली अधिकाऱ्यांची `हजेरी`

सौरभ राव यांनी पुणे पालिकेत पहिल्याच बैठकीत घेतली अधिकाऱ्यांची `हजेरी`

पुणे : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही मिनिटांतच सौरभ राव यांनी मंगळवारी सकाळी स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. तेव्हा नेहमीप्रमाणे स्थायीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. चर्चेचा तपशिल ऐकून घेतल्यानंतर रावांनी बैठकीतच अधिकाऱ्यांची चांगली "हजेरी' घेतली.

"बैठकीतील निर्णयानुसार अहवाल मांडलेच पाहिजेत. त्याकरिता पुन्हा-पुन्हा चर्चेची गरजच काय, असा प्रश्‍न विचारत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटिस बजाविण्याचे फर्मान त्यांनी सोडले. प्रशासकीय बेशिस्त खपवून न घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराही रावांनी यावेळी दिला. स्थायीच्या पहिल्यावहिल्या बैठकीतच रावांनी आपल्या कार्यशैलीची झलक दाखविल्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. 

महापालिकेच्या प्रभारी आयुक्त शितल उगले यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार राव यांनी स्वीकारला. त्यानंतर आपल्या कार्यालयासह काही महत्त्वाच्या खात्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. स्थायी समितीच्या नियोजित बैठकीला ते पोचले आणि सुरवातीला काही वेळ शांत राहिलेले राव विविध विषयांवरील चर्चेत सहभागी झाले

जलतरण तलावाच्या "सेफ्टी ऑडिट'च्या विषयावरून सभेत जोरदार चर्चा रंगली. तळजाई येथील जलतरण तलावात तरुणाचा मृत्यू झाल्याने तलावांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तलावांच्या "सेफ्टी ऑडिट'चा अहवाल मांडण्याची मागणी सदस्यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र, या बैठकीत अहवाल मांडण्यात आला नाही, एवढी गंभीर घटना घडूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार मंजुषा नागपुरे यांनी केली. त्यावरून नागपुरे आणि उगले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यात राव यांनी हस्तक्षेप करीत, अहवाल का मांडला नाही, अशी विचारणा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली. तेव्हा, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राव यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूनावले. प्रशासकीय कामकाजातील तत्पर आणि निर्णय प्रक्रियेबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनावजा आदेश दिले.

 
कुणाल कुमार यांची बदली झाल्यापासून महापालिकेत राव हेच येणार याची चर्चा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त म्हणून राव यांची बदली झाली. तेव्हापासून रावांच्या कार्यपध्दतीची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली. मात्र, पहिल्याच बैठकीत राव यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याने त्यांच्या कामाची "स्टाइल' कशी असेल, याचा अंदाज प्रशासकीय वर्तुळाला आला असावा. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com