Soniya Gandhi inquires about Sumitra Mahajan's chitpavan origins | Sarkarnama

सोनिया गांधी -इटली ते चित्पावन एक प्रवास !

अनंत बागाईतकर : सकाळ न्यूज ब्युरो 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सोनिया गांधी या जन्माने इटालियन आहेत. त्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण किंवा अस्सल, केवळ भारतीयांनाच समजतील अशा गोष्टी फारशा माहिती असण्याचे काही कारणच नाही अशी एक सर्वसाधारण समजूत प्रचलित आहे. 

परंतु इतके वर्षांच्या भारतातल्या वास्तव्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्याचे काही किस्से त्यांच्या भोवतीच्या बंदिस्त भिंती भेदून बाहेर येत असतात. 

सोनिया गांधी या जन्माने इटालियन आहेत. त्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण किंवा अस्सल, केवळ भारतीयांनाच समजतील अशा गोष्टी फारशा माहिती असण्याचे काही कारणच नाही अशी एक सर्वसाधारण समजूत प्रचलित आहे. 

परंतु इतके वर्षांच्या भारतातल्या वास्तव्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्याचे काही किस्से त्यांच्या भोवतीच्या बंदिस्त भिंती भेदून बाहेर येत असतात. 

एकदा परदेशदौऱ्यावर असलेल्या सोनिया गांधी यांनी तेथील प्रतिष्ठित वर्तुळातील महिलांबरोबरच्या संभाषणात खाद्यपदार्थांवर चर्चा केली आणि त्यावेळी तेथे जे खाद्यपदार्थ वाढले जात होते त्यातील एका पदार्थाकडे निर्देश करून त्यामध्ये "कलौंजी' घातली नसल्याकडे लक्ष वेधले. 

"कलौंजी' हा उत्तर हिंदुस्थानातील खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. महाराष्ट्रातील कारळे याच्याशी त्याचे साधर्म्य असते. किंवा काळे जिरे असतात तसला हा पदार्थ आहे. इंग्रजीत याला "ब्लॅक ओनियन सीड्‌स' म्हणतात. पण सोनिया गांधी यांनी "कलौंजी'चा उल्लेख करून सर्वांना चकित करून सोडले होते. 

साधारण तसाच एक प्रसंग नुकताच घडल्याचं कानावर आलं !  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा निरोपसमारंभ संसदेच्या मध्यकक्षात पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी "हाय टी' म्हणजेच चहापानाचा कार्यक्रम होता.  त्यादिवशी पाऊस असल्याने वॉटरप्रूफ तंबू संसदेच्या हिरवळीवर उभारण्यात आले होते.  कार्यक्रम संपल्यावर सर्व अतिविशिष्ट मंडळी या तंबूंमध्ये स्थानापन्न झाली. 

सोनिया गांधी पण होत्या. त्यांच्याबरोबर मराठी खासदार रजनी पाटील होत्या.  चहा घेता घेता सोनिया गांधी यांनी सहजपणे विचारणा केली, "सुमित्रा महाजन चित्पावन आहेत ना ?"
आता आश्‍चर्य करण्याची पाळी रजनी पाटील यांची होती !  त्यांनी सोनिया गांधी यांना विचारले की "तुम्हाला चित्पावन शब्द कसा माहिती ?' 
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, "वसंत साठे पण चित्पावनच होते ना ?"
रजनीताईंनी हो म्हटले. 
सोनिया गांधी यांनी त्यांना सांगितले की इंदिरा गांधी हयात असताना घरगुती गप्पा चालत असत तेव्हा यासंदर्भात आपण ऐकले होते. "पण, वसंत साठे ही जातपात मानत नव्हते'" अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या मूळच्या कोकणातल्या आणि मुंबईतच त्यांनी जीवन व्यतीत केले. विवाहानंतर त्या इंदोरला स्थायिक झाल्या व त्यांची राजकीय कारकीर्दही तेथूनच बहराला आली. त्यांचे माहेरचे आडनाव साठे आहे.  सोनिया गांधी यांनी सुमित्रा महाजन नेमक्या कोण ? याची चौकशी केल्याने त्या भारताशी किती एकरूप झाल्या आहेत याची कल्पना यावी ! 

सोनिया गांधी या पत्रकारांशी क्वचितच संवाद साधतात. पण एक-दोन वेळेस काही सामाजिक कार्यक्रमात अनौपचारिकपणे बोलताना त्यांना घरगुती बनवलेले "दाल-चावल' सर्वाधिक पसंत असल्याचे सांगितले होते. संसदेच्या मध्यकक्षात(सेंट्रल हॉल) मध्ये मिळणारी दाक्षिणात्य कॉफी आणि दोशा---- ही त्यांची आणखी एक भारतीय आवड ! 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्यांना पंडित जसराज यांचे गायन आवडते आणि त्या त्यांच्या चाहत्या असल्याचे सांगतानाच राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांनी पंडितजींच्या अनेक मैफलींचा आस्वाद घेतल्याच्या आठवणीही सांगितल्या होत्या ! 

संबंधित लेख