sonia jaykumar gore | Sarkarnama

अर्धांगिनीमुळे आमदार जयाभाऊंना "सोनिया'चे दिवस ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 जुलै 2017

सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे वादळी व्यक्‍तीमत्त्व आहे. आक्रमक स्वभावाच्या जयुकमार गोरे यांनी फार कमी वेळात राजकीय यश मिळवून दाखवले आहे. यात त्यांचे धाडस, कष्ट, कार्यकर्त्यांची साथ या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबरच त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. सांगलीत राजकीय अवकाश ढुंढाळणाऱ्या जयकुमार यांना माण तालुक्‍यात आणून राजकारणात भक्‍कपणे उभे करणाऱ्या सोनिया हा राजकीय प्रवास व निभावलेल्या जबाबदारींविषयी सांगत आहेत... 

सोनिया जयकुमार गोरे यांच्या हसतमुख, धाडसी आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाने अनेक लोक जोडले. सांगली जिल्ह्यात माहेर असलेल्या सोनिया यांनी सासरी माण तालुक्‍यात येऊन आपल्या कार्याने जयकुमार यांना आत्मविश्‍वास दिला. राजकारणात संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कारण माण तालुक्‍यातील "किंगमेकर'च्या ताकदीला शह देणे तसे सोपे नव्हते. वडील इंजिनिअर आणि आई सामाजिक कार्यकर्ती या वातावरणात वाढलेल्या सोनिया गोरे लहानपणापासून धाडसी. वडील चांगले वक्ते असल्याने त्यांचा तो गुण त्यांना उपयोगी पडला. आईचे सामाजिक काम त्यांच्या आयुष्याला दिशा देत गेले. त्यातून सोनिया यांनी सामाजिक काम सुरू केले. महाविद्यालयीन जीवनात मोठ्या बैठका, मेळावे यात त्या सहभागी होऊ लागल्या. त्यांच्या वक्तृत्वाने चांगली छाप पाडली जात होती. सांगली जिल्ह्यातच त्यांच्या आयुष्यात जयकुमार गोरे आले. प्रेमविवाह झाला. 

जयकुमार यांच्यातील नेतृत्वगुण सोनिया यांनी हेरले होते. परंतु, सांगली जिल्ह्यातील तत्कालिन राजकारणात संधी मिळेल की नाही, याची अनिश्‍चिती होती. जयकुमार गोरे यांचे गाव माण तालुक्‍यात. माण तालुक्‍याच्या राजकारणात येण्याची त्यांची तयारी होत नव्हती. कारण माणमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. सांगलीतील राजकारणापेक्षा माणमध्ये जाऊन संघर्ष करून आपल्या राजकारणाला सुरवात करू, यासाठी सोनिया गोरे यांनी जयकुमार गोरे यांना प्रवृत्त केले. अखेर श्री. गोरे गावाकडे आले. श्री. गोरे गुंड आहेत, त्यांची दादागिरी चालते वगैरे अपप्रचारही सुरू झाला. पण, गोरेंचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू. समोर येणाऱ्या प्रश्‍नांचा सखोल अभ्यास करावयाचा, त्याचे उत्तर शोधायचे, तोडगा काढत पुढे जायचे, हा त्यांचा स्वभाव होता. राजकारणात त्यांचा हा गुण उपयोगी पडणार होता. पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी तळमळ त्यांच्यात होती. त्यासाठी योग्य कृती करण्याची धमक होती. लोकांपर्यंत त्यांचे हे गुण, ही माहिती पोचविण्याची गरज होती. जिल्हा परिषद निवडणुका आल्या. त्यात गोरे विजयी झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय इनिंग सुरू झाली. 

कष्ट, मेहनत करून संघर्षातून यशापर्यंत जाता येते, यासाठी पत्नीच्या भूमिकेतून मोठी साथ दिली. माण मतदारसंघातील माण व खटाव तालुक्‍यांतील गावोगावी भेटी देत त्यांनी लोकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. सोनिया यांनी आपल्या वक्तृत्वाने महिलांना आपलेसे केले. महिलांचे बचत गट स्थापन केले. महिलांना लघुउद्योगाबाबत मार्गदर्शन केले. "पहिले पाऊल तुम्ही टाका' अशी उमेद महिलांना दिली. महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. या साऱ्या प्रयत्नातून सकारात्मक वातावरण तयार झाले. लोकांचा पाठिंबा वाढू लागला. महिला मेळावे सुरू राहिले. त्याचबरोबरीने हळदी-कुंकू, महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, महिलादिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम, होम मिनिस्टरसारखा उपक्रम, माणदेशी महोत्सव असे उपक्रम सुरू ठेवले. राजकारणाच्या वेळी राजकारण इतर वेळी समाजकारणातून संपर्क हे सूत्र अवलंबिले. 

महिलांच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचण्यात त्यांना यश मिळाले. जयकुमार यांचे माण तालुक्‍यातील नेटवर्क तयार झाले. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेच्या सभागृहात गोरे यांच्या कामाची छाप पडली होती. कार्यकर्त्यांचे जाळे वाढत होते. लोकांचा पाठिंबा मिळत होता. तरीही समोर विरोधक ताकदवान होते. जयकुमार गोरे यांच्या संपर्कामुळे आणि सोनिया गोरे यांच्या महिला संघटनामुळे तालुक्‍यातील प्रस्थापितांविरोधाच्या संघर्षाला वाट मिळू लागली. लोकांची ताकद बरोबर येऊ लागली. एक उमदे नवे नेतृत्व माण तालुक्‍याच्या विकासाला दिशा देऊ शकेल, असा विश्‍वास लोकांच्या मनात निर्माण होऊ लागला. अशातच 2009 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढविणे भाग होते. समोर बलाढ्य पक्षाचे बलाढ्य नेते रिंगणात होते. संघर्ष होताच. जयकुमार यांच्या सोबतीला कार्यकर्त्यांचे बळ होते. साऱ्या नेटवर्कची ताकद गोरे यांच्या जिद्दीला साथ देत होती. जयकुमार यांच्या नव्या नेतृत्वाने तालुक्‍याच्या राजकारणात बाजी मारली. संघर्षातून यशाकडे हा मंत्र त्यांनी सिद्ध करून दाखविला. अखेर संघर्षातून साकारलेला विजय हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण होता, असे सोनिया गोरे सांगतात. 

जयकुमार गोरे यांची आमदारकीची टर्मही महत्त्वपूर्ण ठरली. कामाचा धडाका त्यांनी सुरू केला. आपला पूर्ण वेळ लोकांच्या कामासाठी ते देऊ लागले. विकासकामांबरोबरच उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गोरे यांच्यावर मोठा विश्‍वास होता. माणगंगा नदीवर व मतदारसंघात पृथ्वी बंधाऱ्यांची साखळी उभी राहिली. लोकांच्या मनात जयकुमार गोरे यांच्याविषयीचा विश्‍वास अधिकच दुणावत गेला. माण मतदारसंघात एकतर्फी वर्चस्व निर्माण करण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातच मतभेद सुरू झाले. गोरे बंधूंमध्येच राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली. माण मतदारसंघाच्या राजकारणात इतर बलाढ्य पक्षांची ताकद क्षीण झाली. गोरे बंधूंमधील राजकारणाचे दोन गट संघर्ष करू लागले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधूच जयकुमार यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहिले. जयकुमार यांनी दुसऱ्यांदा कॉंग्रेसतर्फे विजय नोंदविला. पण, गोरे बंधूंमधील हा संघर्ष आजही सुरूच आहे. कुटुंब तुटू नये, घरामध्ये मतभेद होऊ नयेत, म्हणून आपण खूप प्रयत्न केले. परंतु, त्यात यश मिळाले नाही, असे सोनिया गोरे सांगतात. 

राजकारणात वर्चस्व मिळविल्यानंतर जयकुमार यांना घरासाठी वेळ देणे दुरापास्त झाले. नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा, मतदारसंघातील संपर्कासाठी गावोगावी भेटी, विविध कामांच्या पाठपुराव्यासाठी सातारा, मुंबई प्रवास असे त्यांचे शेड्युल बिझी झाले. सोनिया यांनी समाजकारणाबरोबरच घराकडे लक्ष केंद्रित केले. बोराटवाडी येथील घराचे प्रांगणातील वातावरण प्रसन्न झाले. ग्रीन हाउस, बागबगीच्याने सौंदर्य खुलविले. त्यांना स्वयंपाकाची आवड आहे. विविध प्रकारचे पदार्थ करून लोकांना खायला घालण्यात त्यांना रस आहे. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी आवर्जून लक्ष ठेवले. त्याचप्रमाणे गावात, परिसरात शिक्षण संस्था सुरू करून परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी, सेमी इंग्रजी शिक्षणाचे दालन खुले केले. एवढा सारा व्याप सांभाळताना अर्थकारणाची बाजूही सांभाळावी लागते. काटकसर करीत हा डोलारा त्या सांभाळतात. जयाभाऊ लोकासांठी वेळ देतात. कुटुंबासाठी देत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. मुलेही म्हणतात, की पप्पा, आमच्यासाठी थोडा वेळ द्या. पण, जयाभाऊंना कामाच्या व्यापातून फुरसत मिळत नसल्याची खंत आहे. पुढील काळात ते कुटुंबासाठी वेळ देतील, अशी आशाही त्यांच्या मनात आहे. 

संबंधित लेख