Sonawane promises to help Mundada to become MLA | Sarkarnama

सोनवणे म्हणाले, मागे चुक झाली आता नमिता मुंदडांनाच  आमदार करणार 

दत्ता देशमुख 
रविवार, 24 मार्च 2019

पक्षाने केज मतदार संघातून नमिता मुंदडा यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतरही सोनवणे गटाकडून मुंदडांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे लोकसभेला सोनवणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंदडांसह त्यांचे समर्थक प्रचारापासून अलिप्त होते. 

बीड : " मागच्या काळात जाणिवपूर्क आणि चुकून झालेल्या चुका पुढे होणार नाहीत. केज विधानसभेला राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडांच उमेदवार असतील आणि त्यांना मीच निवडुन आणणार," असा शब्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिला .

 मुंदडा - सोनवणे गटाचे याकार्यक्रामात  मनोमिलन झाले. नमिता मुंदडाच उमेदवार असणार यावर विरोधी पक्षनेते धनंतज मुंडे यांनीही शिक्कामोर्तब केले. 

केज विधानसभा मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिवंगत  डॉ. विमलताई मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा यांना मागच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांच्या पराभवाच्या मतांचा आकडा वाढला. यात सोनवणे गटाचाही मोलाचा हातभार होता.  पुढेही सोनवणे गटाकडून ऐनकेन प्रकारे मुंदडांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न थांबले नाहीत. मुंदडा विरोधकांचे उमेदवार म्हणून प्रमोशन केले जात होते.

 त्यातच महिन्यापूर्वी नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीवर खुद्द शरद पवार यांनी परळीत शिक्कामोर्तब केले. तसेच केज मतदार संघातील पक्षसंघटनेतील पदे मुंदडा समर्थकांना देण्याच्या सुचना दिल्यानंतरही याकडे बजरंग सोनवणे यांनी कानाडोळा केला. त्यामुळे सोनवणे यांच्या प्रचारापासून नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्यासह समर्थकांनी पाठ फिरविली होती. संताप व्यक्त करणाऱ्या पोस्ट समर्थक समाजमाध्यमांतून व्हायरल करत होते. सोनवणेंच्या होमपिचपवरील पक्षातील ही गटबाजी राजकीय चर्चेचा मुद्दा झाला हेाता. 

ही गटबाजी दुर करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला. धनंजय मुंडे आणि जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यात शनिवारी बैठक होऊन चर्चा झाली. त्यानंतर रविवारी अक्षय मुंदडा यांच्या आई निवासस्थानी मुंदडा समर्थकांची बैठक झाली. श्री. मुंडे, श्री. मुंदडा यांच्यासह उमेदवार बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा व नमिता मुंदडा उपस्थित होत्या. 

यावेळी पक्षांतर्गत विरोधकांकडून होणाऱ्या खच्चीकरणाचे गाऱ्हाणे मुंदडा समर्थकांनी मांडले. त्यावर मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुढे होणार नाहीत. आगामी विधानसभेत नमिता मुंदाच उमेदवार असतील आणि त्यांना आपणच निवडुन आणू असा शब्द श्री. सोनवणे यांनी दिला. त्यावर शेवटी बोलताना धनंजय मुंडे यांनीही शिक्कामोर्तब केले. 

केज मतदार संघातील केज व अंबाजोगाई या दोन्ही तालुक्यांचे पदाधिकारी निवडीचे अधिकारही मुंदडांना देण्यात आले. त्यानंतर या दोन्ही गटांनी मनोमिलन झाल्याचे जाहीर केले. 
 

संबंधित लेख