Some people are in contact with congress to bring down Goa government! | Sarkarnama

गोव्यात भाजप सरकार पाडण्यासाठी अनेकजण कॉंग्रेसच्या संपर्कात  !

अवित बगळे
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील भाजप आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेकजण कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट केला.

पणजी : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील भाजप आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेकजण कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट केला. कॉंग्रेसने आता सरकार पाडण्यासाठी आक्रमक रुप धारण केल्याचे आज त्यांच्या एकंदर देहबोलीवरून जाणवले.

त्या्ंनी कॉंग्रेस भवनमध्ये पत्रकार परीषद घेत नगरनियोजनमंत्री व गोवा फॉरवर्ड या सरकारमधील घटक पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर शरसंधान केले. नवे सरकार आपल्याशिवाय होऊ शकत नाही असे सरदेसाई शनिवारी म्हणाले होते. त्याही पुढे जात त्यांनी कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्या आरोपांना बालिश असे संबोधले होते. कॉंग्रेस पोराटोरांना आरोप करण्यासाठी पुढे करत आहे असाही टोला सरदेसाई यांनी हाणला होता. 

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मैदानात उतरले. पणजीकर हे प्राध्यापक आहेत हे सरदेसाई यांनी विसरू नये असे प्रत्युत्तर देतानाच नगरनियोजन कायद्यात भूरुपांतर सोयीचे व्हावे यासाठी सरदेसाई यांनी केलेल्या दुरूस्त्या कॉंग्रेसचे सरकार आल्यावर रद्द केल्या जातील असे जाहीर केले.

गोवा विधानसभेत कॉंग्रेसचे १६ आमदार आहेत. भाजपचे १४, गोवा फॉरवर्डचे ३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, राष्ट्रवाद कॉंग्रेसचा १ तर अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चेिल आलेमाव यांचा पाठींबा कॉंग्रेसला मिळू शकतो. त्यामुळे कॉंग्रेसला बहुमतासाठी चार आमदारांची गरज आहे. मगोचे तीन आमदार कॉंग्रेस सोबत येत शकतात कारण २००७ ते २०१२ मगोपक्ष कॉंग्रेस सरकारमध्ये होता. त्यामुळे प्रत्यक्षात एकाच आमदाराची गरज कॉंग्रेसला बहुमतासाठी आहे.

भाजपमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलानंतर नाराजी आहे. माजी नगरविकासमंत्री अॅड फ्रांसिस डिसोझा अद्याप अमेरीकेतून परतलेले नाहीत. तेथूनच त्यांनी आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. उपसभापती मायकल लोबो यांनी शनिवारी सर्वांसमक्ष भाजपच्या खासदारांना खाणी सुरु होत नसतील तर तुम्ही निवडणूक लढवू नका असे सांगितले आहे. त्यामुळे विधानसभेचे अधिेवेशन झाले तर तर सरकारपक्षातील कितीजण पक्षादेश असतानाही सरकारच्या बाजूने मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहतील य़ाविषयी शंका आहे. या साऱ्या परिस्थितीचे विश्लेषण करून कॉंग्रेसने आता आक्रमकपणा धारण केल्याचे दिसते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख