Some body is waiting for you please use helmet : Tejasvee Satpute | Sarkarnama

हेल्मेट वापरा , घरी कोणी तरी तुमची वाट बघतंय :  तेजस्वी सातपुते

संपत मोरे 
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

हेल्मेट सक्तीनंतर पहिल्या दिवशी साडेसात हजार, दुसऱ्या दिवशी साडेसात हजार आणि तिसऱ्या दिवशी  साडेनऊ हजार दुचाकीस्वारावर कारवाई झाली आहे. थेट आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून हि कारवाई केली जात आहे. 

-वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते

पुणे :"दोन दिवसापूर्वी हिंजवडीला अमेय शिंदे नावाच्या तरुणाचा अपघात झाला,अपघातात  त्याच्या डोक्याला मार लागला.त्याच्याकडे जर हेल्मेट असते तर तो नक्कीच वाचला असता," अशी भावना पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली . 

पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे,याबाबत वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. काही नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला. याबाबत सातपुते यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या ," हेल्मेट सक्तीला विरोध करणारे लोक अतिशय कमी आहेत ,पण कायदा पाळणारे लोक जास्त आहेत. या दोन दिवसातील चित्र पाहिलं तर रस्त्यावर हेल्मेट परिधान केलेले लोक जास्त दिसतात."

" विरोध करणारे असे भासवत आहेत आम्ही सगळ्या लोकांच्या वतीने बोलतोय पण वास्तव वेगळे आहे. सुजाण पुणेकर कायद्याच्या आणि स्वतःच्या सुरक्षेच्या बाजूने आहेत.त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाचा काळजी आहे .जे लोक विरोध करत आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे 'पोलीस काही तुमचे शत्रू नाही ते कायद्याचे रक्षक आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्तीकडे पोलीस विरुद्ध नागरिक अस पाहू नये, "  असेही त्या म्हणाल्या . 

" हेल्मेट घालणे म्हणजे आम्ही जीवनासोबत आहोत हे दाखवणे आहे,हेल्मेट म्हणजे आपली सुरक्षा आहे,याकडे  पोलीस विरुद्ध नागरिक असे पाहू नये. हेल्मेट घातले नाही म्हणून दरवर्षी पुण्यात २५० लोक मृत्युमुखी पडतात,जे लोक एका छोटयाशा चुकीने आपला जीव गमावतात  त्यांच्या घरातला दुःखाचा अंधार आपण डोळ्यासमोर आणण्याची गरज आहे."

" हेल्मेट नसल्याने मृत्युमुखी पडलेल्या कर्त्या पुरुषांच्या कुटुंबाच्या वेदना जर आपण समजून घेऊ शकलो तर मला वाटत प्रत्येकाला आपण पोलिसांसाठी नाही तर स्वतःसाठी हेल्मेट वापरूया असे वाटेल.जे विरोध करत आहेत त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा समोर आणावा,घरी कोणीतरी वाट बघतंय हे लक्षात घ्याव."अशी भावनिक साद तेजस्वी सातपुते यांनी  पुणेकरांना घातली आहे.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख