solar power to help 4 million farmers for day power supply | Sarkarnama

सौरऊर्जेच्या मदतीने 40 लाख शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज

सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात 300 मेगावॉटचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. ग्रीनसेस फंडासाठी 375 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

मुंबई  : राज्याच्या अर्थसंकल्पातून कृषी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पाद्वारे दिवसा 12 तास विजेची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा 40 लाख कृषिपंप ग्राहकांना होईल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना राबवण्यात येणार आहे. 40 लाख शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी, यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी आणि अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथे या योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. दोन-तीन महिन्यांत हे प्रकल्प सुरू होणे अपेक्षित आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात 300 मेगावॉटचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. ग्रीनसेस फंडासाठी 375 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा; तसेच इतर बाबींसाठी 7 हजार 235 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पायाभूत आराखडा 2 योजनेंतर्गत वितरण प्रणाली सुधारण्यासाठी भांडवलापोटी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मितीसाठी 2018-2019 मध्ये 774 कोटींचा निधी प्रस्तावित आहे, तर 2500 मेगावॉटचे प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महानिर्मितीच्या नव्या प्रकल्पांतर्गत 2120 मेगावॉटच्या प्रकल्पांना 404 कोटी 17 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील 93 हजार 322 कृषिपंपांच्या विद्युत जोडणीसाठी 750 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

संबंधित लेख