solapur's two minister supports mahesh kothe | Sarkarnama

महेश कोठेंना दोन्ही देशमुखांचे पाठबळ

उमेश घोंगडे  
शनिवार, 15 डिसेंबर 2018

येत्या रविवारी जिल्ह्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या सोलापूरकरांची बैठक आयोजित केली आहे. 
  

पुणे : विकासाच्या मुद्यावर राजकारण बाजूला ठेवत शहराचा विकास साधला पाहिजे यावर सोलापुरातील सर्व नेत्यांचे एकमत झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून जाणवू लागले आहे. सोलापूरमध्ये 'आयटी पार्क' उभा राहावा, या क्षेत्रातील कंपन्यांनी सोलापूरला प्राधान्य द्यावे, यासाठी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पाठबळ लाभले  आहे. 

गेल्या तीस-चाळीस वर्षात विकासाच्या पातळीवर सोलापूर मागे पडले. रोजगाराच्या संधी कमी झाल्या. सोलापूरच्या या पिछाडीला सोलापूरचे राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप सार्वजनिकरित्या करण्यात येत आहे. भविष्यात आपल्यावर ही वेळ येऊ नये, यासाठी दोन्ही देशमुखांनी सोलापूरचा विकास मनावर घेतल्याचे दिसत आहे. त्याला माजी महापौर महेश कोठे यांनी कृतीची जोड दिली आहे. कोठे यांनी स्वत: पुढकार घेऊन 32 एकरात आयटी पार्कच्या उभारणीला सुरवात केली आहे. त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार असल्याचे आज पुण्यात सांगितले. पुणे, हैदराबाद, बंगळुरू या ठिकाणी जाऊन नावाजलेल्या मोठ्या कंपन्यांच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. या कंपन्यांचे काम सोलापूरध्ये सुरू करण्यासाठी मन वळविण्यात येणार आहे. यातील पहिली बैठक येत्या बुधवारी मराठा चेंबरच्या सभागृहात आयोजित केली आहे.

कंपन्यांच्या आधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या या बैठकीला पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह सर्व महत्वाचे आधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पुण्यात गेल्या महिन्यात सोलापूर फेस्टिव्हल आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

संबंधित लेख