solapur sauth assembly analysis | Sarkarnama

सुभाषबापूंच्या मतदारसंघात 'आनंदराव देवकते' फॅक्टर निर्णायक ठरणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

एकीकडे श्री. माने हे बेरजेचे राजकारण करत असताना सहकारमंत्री देशमुख यांना पक्षातूनच काहीजण विरोध करू लागले आहेत.

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर स्वकियांसह विरोधकांचेही आव्हान असेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेल्या सहकारमंत्र्यांना 2019 च्या निवडणुकीत स्वकियांसह विरोधकांशीही दोन हात करावे लागतील. त्यात 'दक्षिणे'त "कमळ' फुलणार की कोमेजणार हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
 
नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री देशमुख यांच्या गटाला पराभवास सामोरे जावे लागले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांचे प्रमुख विरोधक असलेल्या कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने अतिशय चतुरपणे डाव टाकत श्री. माने यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विरोधक असलेल्या जवळपास सगळ्यांनाच आपलेसे करून घेतले आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना निश्‍चितच बळ मिळणार आहे. 

एकीकडे श्री. माने हे बेरजेचे राजकारण करत असताना सहकारमंत्री देशमुख यांना पक्षातूनच काहीजण विरोध करू लागले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी दक्षिणमधील सहकारमंत्री विरोधकांना एकत्र करत विधानसभेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे देशमुखांना विरोधक व स्वकीय या दोघांशी सामना करावा लागणार आहे. 

श्री. माने यांच्या विरोधकांना एकत्र करण्याच्या प्रक्रियेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांच्या बाजार समितीमधील पराभवामुळे काहीसा 'ब्रेक' लागला आहे. एकेकाळचे श्री. माने यांचे खंदे समर्थक असलेल्या अप्पासाहेब पाटील यांनी ऐनवेळी सहकारमंत्री गटाकडून बाजार समितीची निवडणूक लढवून श्री. हसापुरे यांचा पराभव केला. त्यामुळे श्री. माने यांनीच माझा जाणूनबुजून पराभव केल्याची भावना श्री. हसापुरे यांची झाली आहे. श्री. हसापुरे यांना पुन्हा आपल्या बाजूने करण्यात माने यशस्वी होणार का? याचीही उत्सुकता आहे. 

तालुक्‍याचे अनेकवर्ष नेतृत्व केलेल्या माजीमंत्री आनंदराव देवकते यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नेमके कुणाला मदत करणार? त्यांची भविष्यातील रणनीती काय असणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. 2014 मध्ये श्री. माने यांचे विरोधक असलेले बाळासाहेब शेळके यांच्याशी त्यांनी मिळते-जुळते घेत त्यांना बाजार समितीचे संचालक केले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री. शेळके यांना बाजार समितीचे सभापतिपद माने यांच्याकडून देण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे गणेश वानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाही सोबत घेत श्री. माने यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. या सगळ्यांना सहकारमंत्री देशमुख यांना तोंड द्यावे लागणार आहे. 

राज्याची जबाबदारी असलेल्या सहकारमंत्री देशमुख यांनी मतदारसंघाशी नाते दृढ ठेवले आहे. राज्याचा कारभार करत असताना वेळ काढून ते तालुक्‍याचा दौरा करतात. त्याचबरोबर श्री. देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांनीही 'दक्षिण'च्या कार्यक्रमात आपली हजेरी वाढविली आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? असाही प्रश्‍न पुढे येतो. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांमध्ये लढत होण्याची शक्‍यता आहे. हे प्रमुख पक्ष त्या-त्या वेळी कोणती भूमिका घेतात, यावरच यशापयश अवलंबून असेल. 

संबंधित लेख