solapur-pranititai-shinde-foul-language | Sarkarnama

प्रणितीताई तुम्हीसुद्धा...!

अभय दिवाणजी
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

एकेकाळी सुसंस्कृत राजकीय नेत्यांमुळेच अनेक पक्षांची ओळख होती. परंतु अलिकडील काळात वाचाळविरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पक्ष-संघटना अडचणीत आल्याचीही उदाहरणे आहेत. कॉंग्रेसमधील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा वारसा म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्या प्रणितीताईंच्या बेताल वक्तव्यामुळे एक वेगळेच वादळ घोंगावू लागले आहे. वाचाळविरांच्या यादीत तुम्हीसुद्धा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

सोलापूर : एकेकाळी सुसंस्कृत राजकीय नेत्यांमुळेच अनेक पक्षांची ओळख होती. परंतु अलिकडील काळात वाचाळविरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पक्ष-संघटना अडचणीत आल्याचीही उदाहरणे आहेत. कॉंग्रेसमधील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचा वारसा म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्या प्रणितीताईंच्या बेताल वक्तव्यामुळे एक वेगळेच वादळ घोंगावू लागले आहे. वाचाळविरांच्या यादीत तुम्हीसुद्धा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

"उजनी जलाशयात पाणी नाही मग मी काय ... करू' या एका वाक्‍याने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवारांची पळता भूई थोडी झाली होती. अलिकडील काळात आपल्या बेताल वक्तव्याने आमदार प्रशांत परिचारक यांना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांच्या कथीत मोबाईल संभाषणावरही मोठे रणकंदन पेटले आहे. आपला तो आवाजच नव्हता आणि मोबाईलवर संबंधिताशी माझे संभाषणच झाले नाही असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली आहे. तरीही त्या संभाषणातील महिलांसंबंधी अन्‌ ज्येष्ठ नेत्यांविषयीच्या अनुद्‌गाराची गंभीर दखल घेतली गेली आहे.

खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल वैयक्तिक पातळीवर विचित्र शब्दप्रयोग वापरून आमदार प्रणिती शिंदे यांनी नसती आफत ओढवून घेतली आहे. अनेक स्थित्यंतरे होत असतानाही तसेच अनेकवेळा आघात होऊनही तोल न सोडलेल्या श्री. शिंदे यांच्या त्या वारस असल्याने त्यांचे हे बोल दुर्दैवीच वाटतात. खासदार बनसोडे यांनीही मंगरुळ (ता. अक्कलकोट) येथील जाहीर सभेत केलेल्या विधानांमुळे त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 

मोबाईलवरून अश्‍लिल बोलणे, असभ्य भाषेत ज्येष्ठांवर टीका-टिप्पण्णी करणे, वैयक्तिक चारित्र्यहनन करणारी भाषणे ठोकून टाळ्या मिळवणे, भगिनींबाबत अश्‍लाघ्य व हिणकस भाषेत संवाद साधून पुन्हा वरकढी म्हणून की काय ? "तो मी नव्हेच'मधील लखोबा लोखंडेची भूमिकाही वठविण्याची अहमहमिका सध्याच्या राजकारणातील नवी पिढी करू लागली आहे. सध्या सोशल मिडिया प्रचंड प्रभावी होत असल्याने त्यातच आपले बोल ध्वनिमुद्रित होत असल्याने पुराव्याची गरजच पडत नाही, त्यामुळे आपले भाष्य तोलून मोलून व जरा जपूनच आवश्‍यक आहे, हे ही मंडळी कानीडोळा टाकू लागली आहे.

सुसंस्कृत महाराष्ट्राने आदर्श घालून दिलेल्या राजकारणाचे धडे गिरवण्यापेक्षा एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी शोधली जावू लागली आहे. ज्येष्ठांचा सन्मान करण्याची परंपरा असलेल्या आपल्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. 

संस्काराची शिकवण 
महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची दिशा देणाऱ्या (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी संस्काराची मोठी शिदोरी दिली आहे. श्री. चव्हाण यांनी विरोधी पक्षातील तत्कालिन नेते (स्व.) एस. एम. जोशी, (स्व.) भाई उद्धवराव पाटील, (स्व.) रामभाऊ म्हाळगी, (स्व.) आचार्य प्र. के. अत्रे यांच्याबद्दल सन्मानाचीच भूमिका ठेवली होती. राज्यातील सुसंस्कृत नेत्यांमध्ये वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, गणपतराव देशमुख अशी नावांची मोठी यादीच होईल. राजकारणात अनेकांचे संबंध पक्षातीत आहेत. दस्तुरखुद्द सुशीलकुमार शिंदे यांचे अनेक पक्षातील नेत्यांशी मधूर संबंध आहेत. एकमेकांचा सन्मान ठेवून राजकारणात वाटचाल करण्याचाच सल्ला द्यावा लागण्याचे दुर्दैव आपल्या भाळी आले आहे. 

संबंधित लेख