Solapur-Pandharpur news - devendra fadanvis | Sarkarnama

वारकऱयांशी चर्चा करूनच विठ्ठल मंदिर समितीच्या ऊर्वरित सदस्यांच्या नेमणुका : मुख्यमंत्री

अभय जोशी 
मंगळवार, 4 जुलै 2017

श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर समितीच्या कायद्यानुसार मंदिर समितीवर डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्या संदर्भात वारकऱ्यांचे आक्षेप आहेत. परंतु या समितीच्या सर्व सदस्यांची अजून नियुक्ती झालेली नाही. वारकरी मंडळींशी चर्चा करुन मंदिर समितीमधील ऊर्वरित सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर समितीच्या कायद्यानुसार मंदिर समितीवर डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्या संदर्भात वारकऱ्यांचे आक्षेप आहेत. परंतु या समितीच्या सर्व सदस्यांची अजून नियुक्ती झालेली नाही. वारकरी मंडळींशी चर्चा करुन मंदिर समितीमधील ऊर्वरित सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर समितीवर सध्या वारकऱ्यांचे फक्त दोनच प्रतिनिधी आहेत. जाहीर केलेली मंदिर समिती बरखास्त करा आणि समितीवर वारकऱ्यांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी घ्या, या मागणीसाठी काल सायंकाळी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा थांबवण्यात आला. मात्र, आश्‍वासनानंतर वारकऱयांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या पार्श्वभूमीवर आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी, ''ऊर्वरित सदस्यांची नियुक्ती वारकऱयांशी चर्चा करूनच केली जाईल,'' असे सांगितले.  

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ''मागील वर्षीच्या आषाढीच्या पूजेच्या वेळी दुष्काळाचे सावट दूर कर, भरभरुन पाऊस पडू दे, उत्तम पीक येऊ दे असे साकडे घातले होते. विठुरायाची कृपा झाली, राज्यात चांगला पाऊस झाला. उणे विकास दर असलेला आपला महाराष्ट्र अनेक वर्षानंतर ''पॉझिटिव्ह ग्रोथ''मध्ये आला. तथापी अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी आज केली आहे.'' 

फडणवीस म्हणाले, ''काल कॅनडा शासनाचे ट्रेड कमिशनर आले होते. कॅनडाच्या फेडरेशनला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने कॅनडा-भारत सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला पंढरपूर विकासासाठी निधीसह सर्वती मदत करु, अशी मनिषा त्यांनी बोलून दाखवली आहे. विठुरायाचा महिमा मोठा असल्यामुळेच त्यांच्याकडून हा प्रस्ताव आला आहे. त्यांच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धिकरणासह येथील ''इनफ्रास्ट्रक्चर''सह विकास कामे करण्याचा प्रयत्न केला जाईल.''

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख