solapur north assembly seat analysis | Sarkarnama

देशमुखांना 'कोठे'च आव्हान देवू शकतात, पण 'कोठे' लढायचे हेच त्यांचे निश्चीत नाही!

प्रमोद बोडके 
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

कोठे यांच्या ताकदीला बसप, राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसची जोड मिळणे आवश्‍यक आहे.

सोलापूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी 15 वर्षांपासून ताबा ठेवला आहे. शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून पालकमंत्री देशमुखांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. या मतदार संघात 2019 साठी कॉंग्रेसकडून उदय पाटील, राष्ट्रवादीकडून संतोष पवार, बसपकडून आनंद चंदनशिवे या नवख्या नावांची चर्चा होऊ लागली आहे.  

लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदारसंघाला भेदण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघात भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात दिसत आहे. कोठे 'उत्तर'मधून लढणार की 'मध्य'मधून या प्रश्‍नाचे गणित अद्याप अधांतरी दिसत आहे. 

बसप गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिकेच्या माध्यमातून या भागात केलेली विकासकामे, दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. लिंगायत बेल्टमध्ये नाराज लिंगायत समाजाच्याच माध्यमातून पालकमंत्री देशमुखांना शह देण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने सिद्धेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी व उदय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काडादी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता कमी आहे. शिवाय सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणात भाजपने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या दिलदारपणामुळे काडादी यांच्या नावाबद्दल साशंकता वाटत आहे. 

'मध्य'मध्ये कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये माजी आमदार दिलीप माने दावेदार आहेत. त्यामुळे या दोन मतदार संघाची आशा न करता दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत शहर उत्तर आपल्याला मिळू शकतो त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. या मतदार संघातून मनोहर सपाटे, महेश गादेकर यांनी नशीब अजमावूनही फार काही हाती न लागल्याने आता राष्ट्रवादीच्या वतीने नवा चेहरा म्हणून शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे.

पालकमंत्री देशमुख यांचा पराभव करण्यासाठी कोठे यांच्या ताकदीला बसप, राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसची जोड मिळणे आवश्‍यक आहे. ही जोड मिळाली तरच पालकमंत्री देशमुख यांच्या विजयाचा वारू सहज रोखता येईल.

संबंधित लेख