सोलापूरच्या विकासाचे घोडे आडले मालक-बापूंच्या वादात! 

सोलापूरचा विकास सध्या भाजपच्या दोन रत्नांकडं आहे... पहिले आहेत... सुभाष देशमुख. दुसरे आहेत.... विजयकुमार देशमुख. पहिले आहेत... कॅबिनेट मंत्री. दुसरे आहेत... राज्यमंत्री. पहिले आहेत... सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री. दुसरे आहेत... जिल्ह्याचे पालकमंत्री; तसेच आरोग्य-परिवहन-कामगार-राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री. पहिल्या देशमुखांना अख्खा जिल्हा 'बापू' म्हणून ओळखतो. दुसऱ्या देशमुखांना अख्खा जिल्हा 'मालक' म्हणून ओळखतो. बापूंचा शहर आणि आसपासच्या तालुक्‍यांत राबता, तर मालकांचा सोलापूर शहरात.
सोलापूरच्या विकासाचे घोडे आडले मालक-बापूंच्या वादात! 

सोलापूरचा विकास सध्या भाजपच्या दोन रत्नांकडं आहे... पहिले आहेत... सुभाष देशमुख. दुसरे आहेत.... विजयकुमार देशमुख. पहिले आहेत... कॅबिनेट मंत्री. दुसरे आहेत... राज्यमंत्री. पहिले आहेत... सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री. दुसरे आहेत... जिल्ह्याचे पालकमंत्री; तसेच आरोग्य-परिवहन-कामगार-राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री. पहिल्या देशमुखांना अख्खा जिल्हा 'बापू' म्हणून ओळखतो. दुसऱ्या देशमुखांना अख्खा जिल्हा 'मालक' म्हणून ओळखतो. बापूंचा शहर आणि आसपासच्या तालुक्‍यांत राबता, तर मालकांचा सोलापूर शहरात. 

देशमुख घराण्यामुळं मालकांना सोलापूरच्या गावठाणात, मध्यवर्ती भागात कमालीचं महत्त्व. साहजिकच सोलापूर शहरात घराघरांत पक्ष वाढवण्यात मालकांची आघाडी, तर बापूंची जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची मोठी कामगिरी. राजकीय प्रवासाच्या श्रीगणेशाचा उल्लेख करताना दोघंही सोलापुरातील भाजपचे पहिले खासदार लिंगराज वल्याळ यांचा आदरानं उल्लेख करतात. दोघंही संयमी, मितभाषी, सामंजस्याचे राजकारण करणारे. समाजकारणातून राजकारणातला हा दोघांचाही गेल्या वीस वर्षांतील समांतर प्रवास. मालकांनी विधानसभेत जाण्याची हॅट्रिक केली, तर बापूंनी विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभा असा तिहेरी फेरा मारला. 

समांतर चालणाऱया या दोन भाजप रत्नांची टक्कर आता रोजचीच झाली आहे. सत्ता जशी येत गेली, तसा हा कुरघोडीचा खेळ जीवघेणा होत गेला. सोलापूरच्या राजकीय पटावर ग्लॅडिएटर अर्थात विजयी योद्धा होण्यासाठी दोघंही रोजच रक्तबंबाळ होताहेत. त्यांच्या साठमारीत सोलापूरचा विकास ठप्प झालाय. देशमुख-देशमुख वादाचा हा सोलापुरी तमाशा 2014 नंतर टोकाचा झालायं. गेल्या चार महिन्यांपूर्वी मिळालेल्या महापालिकेच्या सत्तेने तो परमोच्च बिंदूवर पोचलाय. परिणामी सत्ता असूनही अद्याप सत्ताधारी भाजपला महापालिकेचा अर्थसंकल्प मांडता आलेला नाही. आज हा अर्थसंकल्प मांडला जाईल, असं बोललं जातंय. मांडला जाईल, की नाही, हे अद्यापही अनिश्‍चितच आहे. थोडक्‍यात काय तर, राजकीय प्रगल्भतेच्या दारिद्रयाचे फळ सोलापूर महापालिका क्षणोक्षणी भोगते आहे. 

सोलापूरच्या राजकीय इतिहासाकडे नजर टाकल्यावर, मालक आणि बापू यांचातला संघर्ष टोकाचा असूनही, तो 2014 पर्यंत कधी जाणवला नव्हता. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना चारीमुंड्या चित करून भाजपचे ऍड. शरद बनसोडे हे मोदी लाटेत विक्रमी मतांनी निवडून आले. कॉंग्रेसला बसलेला हा मोठा हादरा होता. त्याच वेळी हा निकाल शिंदे यांना तुल्यबळ ठरेल असा उमेदवारही मिळत नसलेल्या भाजपचा आत्मविश्वास कैक पटीने वाढवणारा ठरला. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार देशमुख मोठ्या मताधिक्‍याने तिसऱयांदा निवडून आले. मालकांचा घराघरापर्यंत असलेला संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या विणलेल्या जाळ्याचा हा दृश्य परिणाम होता. याच निवडणुकीत सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडून आले. थोडक्‍यात, 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींनी अख्या जिल्ह्यात भाजपच्या पारड्यात दोन आमदार आणि एक खासदार दिला. 

राज्याच्या गादीवर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यावर मंत्रिपद मालकांना मिळणार, की बापूंना या चर्चेनं सोलापूरचं राजकीय क्षितिज व्यापलं. जसे-जसे दिवस पुढे जात राहिले, तशी दोन्ही गटांची धाकधुक वाढत गेली. अखेर मालकांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडली. सुभाष देशमुख बाजूला फेकले गेले. मालक आणि बापू यांच्यातला पहिला कडवटपणा सोलापूरकरांना ऑक्‍टोबर 2014 मध्ये फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ बनताना पाहायला मिळाला. परंतु, त्यात विजय मात्र मालकांचा झाला.

मालक आणि बापू यांच्यातील ताणलेल्या संबंधांचा प्रत्यय पुढील वर्षी म्हणजेच 2015 मधील सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने जानेवारीत पुन्हा आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून सिद्धेश्वर देवस्थान कमिटी आणि तत्कालिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू झाला. या संघर्षात सुभाष देशमुख जिल्हाधिकाऱयांच्या मदतीला उतरले, तर विजयकुमार देशमुख राज्यमंत्री असूनही सरकारविरोधात सिद्धेश्वरभक्तांनी काढलेल्या मोर्चात सामील झाले. या शह-काटशहामध्ये जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली, ती आजतागायत कायम आहे. 

विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्रिपद मिळाले. साहजिकच मालक-बापू यांच्यातील सुप्त संघर्षाचा आयाम दिवसेंदिवस वाढत गेला. या संघर्षाने उघड स्वरुप धारण केले. 'मंत्रिपद हवच,' या एकाच ध्यासानं बापूंना घेरलं. बापूंची मनोकामना पूर्ण झाली ती गेल्या जुलैमध्ये. मंत्रिमंडळ विस्तारात बापूंना स्थान मिळाले आणि हा गट एकदम सुखावला. सुभाष देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाला धक्का बसला. या दोन गटांत वाद सुरू होताच. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीने त्यात तेल ओतण्याचे काम केले आणि वणवा पेटतच गेला. 

महापालिका निवडणुकीत भाजपला 102 पैकी सर्वाधिक 49 जागा मिळाल्या. शोभा बनशेट्टी महापौर झाल्या. सत्तेसाठी आवश्‍यक असणाऱया तीन जागा मिळवताना, विषय समित्यांच्या निवडी होताना आणि स्वीकृत नगरसेवक ठरवताना भाजपतील अंतर्गत संर्घषाचे दर्शन सोलापूरकरांना घडलेच. सत्तेवर विराजमान झाल्यावर अर्थसंकल्प मांडण्यात मार्चमध्ये तांत्रिक अडचणी होत्या. परंतु, आज चार महिने झाले, तरी अर्थसंकल्प मांडला जात नाही. साध्या-साध्या कामांसाठी प्रशासनाकडे दमडीही नाही. या साऱयामध्ये शिवसेना-कॉंग्रेस-एमआयएम-राष्ट्रवादी कॉंग्रेस-बहुजन समाज पक्ष-कम्युनिस्ट पक्ष हे सारे विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, मालक आणि बापू यांच्या गटांतील हल्ले-प्रतिहल्ले बंद झाले, तरच विरोधकांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळेल. मालक-बापूंच्या या सुंदोपसुंदीत सोलापूरकरांबरोबरच भाजपलाही फटका बसतो आहे. पण हे कोण लक्षात घेणार... मालक, बापू, भाजप, की जनता ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com