माळशिरसचे मुंबई निवासी आमदार डोळस मतदारसंघात वारीनिमित्त डिजिटल फलकांवर अवतरले!

आमदार हनुमंत डोळस यांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डिजिटल फलक लावून स्वागताची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे माळशिरसचे मुंबई निवासी आमदार एकदाचे मतदारसंघात अवतरल्याची भावना लोक बोलून दाखवत आहेत.
माळशिरसचे मुंबई निवासी आमदार डोळस मतदारसंघात वारीनिमित्त डिजिटल फलकांवर अवतरले!

नातेपुते : आमदार हनुमंत डोळस यांनी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डिजिटल फलक लावून स्वागताची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे माळशिरसचे मुंबई निवासी आमदार एकदाचे मतदारसंघात अवतरल्याची भावना लोक बोलून दाखवत आहेत.  

आमदार डोळस हे खासदार विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह ऊर्फ बाळदादा मोहिते-पाटील यांच्या पुण्याईमुळे व संघटन कौशल्यामुळे अतिशय चुरशीची निवडणुकीतही सलग दोन वेळा विजयी झाले आहेत.
  
आमदार डोळस यांचे मतदारसंघात कुठल्याही गावात कार्यकर्त्यांचे जाळे नाही. संघटन कौशल्य नाही. तालुक्यातील110 गावांपैकी प्रत्येक गावात 10 कार्यकर्ते ही परिचयाचे नाहीत. एवढे असूनही मोहिते पाटील कुटुंबामुळे ते आमदार होत आहेत. 
निवडून आल्यानंतर ते कोणाशीही संपर्क ठेवत नाहीत. फक्त दिवाळी आणि पालखीला शेकडो डिजिटल फलक लावून आपले अस्तित्व जनतेला दाखवणे एवढेच, त्यांचे काम आहे. त्यामुळे त्यांचे डिजिटल बोर्ड पाहून आमदार प्रकटले असे लोक बोलू लागले आहेत.

आमदार डोळस यांच्या विरोधात उत्तम जानकर यांनी 2009 साली निवडणूक लढवली. या चुरशीच्या लढतीत डोळस 7500 मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या निवडणुकीत आमदार डोळस यांच्या विरोधात उत्तम जानकर यांना जातीचा दाखला अवैध झाल्यामुळे निवडणूक लढविता आली नाही. त्यांनी अनंत खंडागळे या तरूणास उमेदवारी दिली. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक न लढविल्यामुळे खंडागळे यांना चप्पल हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. मतदार यादीत त्यांचा 16 व्या नंबरवर नाव होते तरीही त्यांना विरोधी पक्षाच्या  एकजुटीमुळे 70 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. खंडागळे यांच्यासाठी  एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. 

शिवसेनेने लक्ष्मण सरवदे या मुंबईकर  उमेदवारास निवडणूक रिंगणात  उतरवले होते. त्यांना शिवसेनेमुळे 25 हजार मते मिळाली होती. 

तिरंगी लढत झाल्यामुळे आमदार डोळस यांचा  6 हजार 600 मतांनी विजय झाला होता. तिरंगी निवडणूक  असूनही निसटता विजय झाला असला तरी आमदार  डोळस हे जनताभिमूख काम करताना दिसत नाहीत. 10 वर्षांत एकही प्रभावी योजना राबविली नाही. अधिकारी व प्रशासनांवर वचक नाही. माळशिरस पंचायत समितीमध्ये सुमारे 42 लाख रूपयांचा शौचालय घोटाळा झाला आहे. यातील आरोपी अद्याप मोकाट  आहेत. लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. या विषयावर ते सभागृहात बोलताना दिसले नाहीत. 

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांचे माळीनगर व श्रीपूर येथील साखर कायखान्यांविरुद्ध पर्यावरण खात्याकडे तक्रार करून कारवाईचा आग्रह धरतात. त्याचवेळी तालुक्यातील तरूण व शेतकर्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या औद्योगिक वसाहतीस विरोध करतात. निरा-देवधरचे पाणी तालुक्याला मिळण्यासाठी आग्रही भूमिका ठेवत नाहीत. 

निरा उजवा कालव्याचे पाणी पूर्वी प्रत्येक फाट्यास तीन आठवड्याला येत होते. मागील चार-पाच वर्षांपासून या फाट्यांना 3 महिन्यानंतर पाणी येते. त्यामुळे शेतकरी बागायती क्षेञ असूनही पाण्याअभावी कर्जबाजारी झाला आहे. 
शेतकरी प्रश्नाविषयी ते संघर्ष  करताना 10 वर्षांत एकदाही दिसले नाहीत. वैयक्तिक व गावपातळीवरील  कामासंदर्भात कोणी फोन केला तर ते `शिवरत्न बंगल्यावर संपर्क साधा' असे स्पष्ट सांगतात. 

माळशिरस तालुक्याचे दुर्दैव असे की अशा मुंबई निवासी व वरिष्ठ पातळीवर वावरणारा लोकप्रतिनिधी तालुक्याला लाभला आहे. असे आमदार वारीच्या निमित्ताने डिजिटल बोर्डवर पाहण्यास मिळत  आहेत. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे 200 बोर्ड त्यांनी पालखी मार्गावर लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com