बनसोडेसाहेब, गडकरी-फडणवीसांनाही 'कासव' समजता काय? 

सोलापूर :सोलापुरातील भाजपच्या गटातटाची चर्चा नेहमीच होत असते. अनेकवेळा केवळ चर्चाच होते. मात्र, गटबाजी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्टही झाले आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार शरद बनसोडे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याचाच राग मनात धरून की काय त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याकडेही पाठ फिरवली. त्याबाबत पक्षकार्यकर्त्यांमध्ये "खासदारसाहेब, हे बरं नव्हं' असे बोलले जाऊ लागले आहे.
बनसोडेसाहेब, गडकरी-फडणवीसांनाही 'कासव' समजता काय? 

सोलापूर :सोलापुरातील भाजपच्या गटातटाची चर्चा नेहमीच होत असते. अनेकवेळा केवळ चर्चाच होते. मात्र, गटबाजी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्टही झाले आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार शरद बनसोडे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याचाच राग मनात धरून की काय त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याकडेही पाठ फिरवली. त्याबाबत पक्षकार्यकर्त्यांमध्ये "खासदारसाहेब, हे बरं नव्हं' असे बोलले जाऊ लागले आहे. 

मोक्‍याच्या वेळी जागा होणारा ससा असून हा ससा कासवाला निश्‍चितच हरवेल असा दांडगा आत्मविश्‍वास खासदार बनसोडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. "ससा व कासवा'मध्ये हे भांडण होण्यामागे खासदार अमर साबळे हे कळीचा मुद्दा ठरले आहेत. सोलापूर लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने खासदार बनसोडे खडबडून जागे झाले. सहकारमंत्री देशमुख यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी खासदार साबळे आले होते, त्यावेळी ते सोलापूर लोकसभेचे निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. ही चर्चा खासदार बनसोडे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यानंतर काहीच दिवसात बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सहकारमंत्री देशमुख यांच्यावरच हल्ला चढविला. कासवाला उलटे पाडून टाचणी टोचविण्याची भाषाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. खरा प्रश्‍न हा आहे की खासदार बनसोडे यांना नेमकी कशाची जाणीव झाली म्हणून त्यांनी थेट सहकारमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला चढविला. इतके दिवसही त्यांच्यामध्ये धुसफूस होतीच, पण, खासदार साबळे यांचे नाव पुढे आल्याने त्या धुसफुसीने पेट घेतला असल्याचे स्पष्ट होते. 

तुळजापूर तालुक्‍यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी सोलापूरला आले होते. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी हे सर्वजण फडणवीस व गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले. याच कालावधीत खासदार बनसोडेही सोलापुरात होते. मात्र, त्यांना या दोन्ही नेत्यांच्या स्वागताला जाणे योग्य वाटले नाही. राज्याचा प्रमुख आपल्या स्वःताच्या जिल्ह्यात येतो म्हटल्यावर त्यांचे आदरातिथ्य करणे गरजेचे असतानाही त्याकडे खासदार बनसोडे यांनी पाठ फिरवली. एवढेच नाही तर त्यांचे लोकसभेतील सहकारी नितीन गडकरी हेही सोलापुरात आले होते. मात्र, त्यांच्या स्वागतालाही जाणे खासदार बनसोडे यांनी कटाक्षाने टाळले. सहकारमंत्री देशमुख व पालकमंत्री देशमुख यांच्यामधील पक्षांतर्गत हेवेदावे सोलापूरला परिचित आहेत. तरीही, हे दोन्हीमंत्री मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले. मात्र, खासदार बनसोडे यांनी या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांचे स्वागत करतो. मात्र, खासदार बनसोडे यांना तेही करणे जमले नाही. त्यांची ही गोष्ट भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूपच खटकली आहे. कोणताही कार्यकर्ता त्याबाबत उघडपणे काहीच बोलत नाही. मात्र, "खासदारसाहेब, हे बरं नव्हं' असे ते सहज बोलून जात आहेत. भविष्यात खासदार बनसोडे यांच्याकडून अशी अपेक्षा नसल्याचे मतही ते व्यक्त करतात. खासदार बनसोडे यांच्या या वागण्याचा काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे हे मात्र निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com