Solapur : MLC Tanaji Sawant has upper hand in posting | Sarkarnama

सोलापूरच्या शिवसेनेची सूत्रे आमदार तानाजी सावंताच्या हाती

भारत नागणे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर व पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सावंत यांनी आपल्या कट्टर समर्थकांची वर्णी लावली आहे.

पंढरपूर :  सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या  निवडीवर शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांची छाप असल्याचे दिसून आले आहे. सोलापूर व पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सावंत यांनी आपल्या कट्टर समर्थकांची वर्णी लावली आहे.

 पंढरपूर विभागाच्या अध्यक्षपदी  संभाजी शिंदे यांची तर सोलापूर ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश वानकर यांची निवड केली आहे. डाॅ. धवलसिंह मोहिते यांच्या जागी लक्ष्मीकांत ठेगे पाटील यांची सहसंपर्कप्रमुखपदी निवड केली आहे. तर आमदारांचे बंधू  प्रा.शिवाजी सावंतांकडे समन्वयक म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्यापदाधिकारी निवडीवर आमदार सावंतांचे वर्चस्व असल्याचे या निमित्ताने स्पष्ठ  झाले आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने  सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे स्थान अधिक बळकट करण्य़ासाठी पक्ष पातळीवरुन पक्ष संघटनेत खांदे पालट केली आहे. यामध्ये धनंजय डिकोळे यांचा पध्दतशीरपणे पत्ता कट करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत ठोगे  पाटलांना सहसंपर्कप्रमुख पदावर  बडती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेनेच्या नव्या पदाधिकार्यांच्या निवडीमध्ये आमदार तानाजी सावंतांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

पंढरपूर व सोलापूर ग्रामीण विभागात सेनेची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने आमदार तानाजी सावंतांनी पक्ष संघटनेत महत्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या बदलामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे मात्र जून्या व निष्ठावंत सैनिकांमधून नाराजीचा सूर एेकू येत आहे.आगामी निवडणूकीच्या निमित्ताने केलेले बदल सेनेसाठी किती लाभदायक ठरतील हे येणाऱ्या काळात  दिसून येईल.
 

संबंधित लेख