solapur front against subhash deshmukh | Sarkarnama

सुभाष देशमुखांचे हिशेब चुकते करण्यासाठी दुसऱ्या देशमुखांची महाआघाडी 

प्रमोद बोडके 
गुरुवार, 8 मार्च 2018

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे असलेला राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपमधील पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाने सर्वपक्षीय महाआघाडीची मोट बांधली आहे. सहकार मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून सहकारमंत्री देशमुखांना त्यांच्याच होमपिचवर आउट करण्यासाठी ही समविचारी टीम कामाला लागली आहे. 

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे असलेला राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपमधील पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाने सर्वपक्षीय महाआघाडीची मोट बांधली आहे. सहकार मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून सहकारमंत्री देशमुखांना त्यांच्याच होमपिचवर आउट करण्यासाठी ही समविचारी टीम कामाला लागली आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालकमंत्री देशमुख गटाला सहकारमंत्री देशमुख हे पणन व सहकार खात्याच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पालकमंत्री देशमुख गटाची एकी आणखीच वाढली आहे. या वाढलेल्या एकीचा प्रत्यय बार्शीतील माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंती उत्सवातून दिसून आला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळीराम साठे, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके यांच्या जोडीला आता सिद्धेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार रतिकांत पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, शिवसेना नेते प्रकाश वानकर यांचीही ताकद या समविचारी महाआघाडीत ग्राह्य मानली जाते. 

या निवडणुकीच्या माध्यमातून सहकारमंत्री विरोधी गटाने नव्या-जुन्या उमेदवारांचा मेळ घालण्याची तयारी सुरू केली आहे. सोलापूर शहर व कुमठे गाव असलेल्या कुंभारी गणातून व व्यापारी मतदार संघातून पालकमंत्री देशमुख यांचा अथवा त्यांच्या गटाचा सोलापूर बाजार समितीत प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. हिरज व पाकणी येथून माजी आमदार दिलीपराव माने अथवा त्यांच्या विचारांचा कार्यकर्ता, आमदार म्हेत्रे अथवा त्यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे, अप्पू पाटील वडगबाळकर, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, सुभाष पाटोळे, कोरे-देशपांडे-म्हेत्रे यापैकी एक, सुरेश हसापुरे, बळीराम साठे अथवा त्यांचे चिरंजीव बाबा साठे, औरादमधून बाळासाहेब शेळके अथवा अमर पाटील यांना उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना आमदार करण्यात व जिल्हा परिषदेत अपक्ष सदस्य संजय शिंदे यांना अध्यक्ष करण्यात अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आता आमदार म्हेत्रे-पालकमंत्री देशमुख-माजी आमदार माने यांच्यासह इतर नेत्यांची महाआघाडी सहकारमंत्री देशमुखांना कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाली आहे. या निवडणुकीत 2019च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची अनेक राजकीय समीकरणे जन्माला येणार हे निश्‍चित. 

संबंधित लेख