solapur dhngar meeting | Sarkarnama

धनगरांची फसवणूक; भाजप नेत्यानेच केला आरोप! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शिवसेना, संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा 
धनगर आरक्षण आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नामांतर करण्याबाबत संभाजी ब्रिगेड, संभाजी आरमार, अखिल भारतीय कैकाडी समाज, शिवसेना आदी 29 पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच 28 ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चाचे नियोजन चोख करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

सोलापूर :  सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करणे आणि आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत आहे, असा घरचा आहेर भाजपचे नेते तथा महापालिकेतील सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आज येथे दिला. 

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करावे, या मागणीसाठी बुधवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. त्या वेळी पाटील बोलत होते. कॉंग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, शैलेश पिसे, रघू कोळेकर, सुनील बंडगर, संभाजी आरमारचे तात्यासाहेब वाघमोडे, माजी सभापती भीमाशंकर जमादार, संभाजी ब्रिगेडचे श्‍याम कदम उपस्थित होते. अहिल्यादेवी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान 28 ऑगस्ट रोजी धनगर समाज आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

भाजप नेते सुरेश पाटील म्हणाले, ""सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. असे असतानाही सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाने याला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे कुलगुरू यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी कुलगुरूंचा निषेध करतो.'' या वेळी बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे यांच्यासह विविध मान्यवरांनी भाषणात आरक्षण आणि विद्यापीठाच्या नामकरणाबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला आहे. तो शब्द पाळवा आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी असे नामकरण केल्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी केली. समाजाच्या मतावर शासन सत्तेवर आले आहे. हे त्यांना आता लक्षात आणून देण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षपातीपणा सोडून समस्त बांधवांनी येत्या सोमवारी मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीत मोर्चासाठी नियोजन करण्यात आले. या वेळी राम वाकसे, सुनील बंडगर, तात्या वाघमोडे, निर्मला पाटील, निमिषा वाघमोडे, सुनील ठेंगील, तुकाराम कोळेकर, आनंद भवर, राज सलगर, नरेंद्र काळे, कैकाडी समाजाचे अनिल जाधव, श्‍याम कदम, सुधीर सलगर, सदाशिव सलगर, सिद्धारुढ बेडगनूर आदी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख