Solapur Corporation Give one Thousand Years Time | Sarkarnama

मानधनाची संमती देण्यासाठी सोलापूरच्या नगरसेवकांना एक हजार वर्षे मुदत  - नगरसचिव कार्यालयाचा भोंगळ कारभार 

विजयकुमार सोनवणे  
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

केरळ आपत्तीबाबत झालेल्या ठरावानुसार संमतिपत्र देण्यासाठी नगरसचिव कार्यालयाने सर्व नगरसेवकांना पत्र पाठविले. हे पत्र बऱ्याचजणांच्या नजरेस पडलेले नाही. त्यामुळे मानधन वळते करून घेतले जाणार आहे याची अनेकांना कल्पना नाही. 

सोलापूर : पूरग्रस्त केरळला मदत करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला. त्यामुळे सप्टेंबरच्या मानधनातून ही रक्कम वळती करण्यात येणार आहे.  धक्कादायक  म्हणजे, मानधन जमा करण्याचे संमतिपत्र देण्याची मुदत 29 सप्टेंबर 3018 पर्यंत म्हणजे तब्बल हजार वर्षे देण्यात आली आहे. 

केरळ आपत्तीबाबत झालेल्या ठरावानुसार संमतिपत्र देण्यासाठी नगरसचिव कार्यालयाने सर्व नगरसेवकांना पत्र पाठविले. हे पत्र बऱ्याचजणांच्या नजरेस पडलेले नाही. त्यामुळे मानधन वळते करून घेतले जाणार आहे याची अनेकांना कल्पना नाही. 

दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ऐच्छिक स्वरूपात देण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. केरळच्या आपत्तीला खूप दिवस झाल्याने गांभीर्य राहिले नाही. त्यामुळे वेतन कपात करू नये, असे पत्र देण्याच्या तयारीत अनेकजण आहेत. पालिकेत सुमारे साडेपाच हजार कायम कर्मचारी आहेत. त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. 

केरळसाठी वैयक्तिक मदत केल्यामुळे मानधन न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही आपत्ती वेळी आमची संस्था पुढाकार घेते, गरज पडल्यास निश्‍चित मदत करू 
- फिरदोस पटेल, नगरसेविका (काँग्रेस) 

नगरसचिवांचे पत्र मिळाल्याबरोबर संमतिपत्र दिले आहे. आमच्या पक्षाच्या इतर सदस्यांच्या निर्णयाची माहिती नाही. 
- आनंद चंदनशिवे, गटनेता (बसप) 

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे मानधन देण्याचा पहिला निर्णय शिवसेनेने जाहीर केला. त्यानुसार संमतिपत्र त्वरित दिले 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक (शिवसेना) 

मानधन वळते करून घेण्याचे संमतिपत्र देण्याचे पत्र मला मिळाले नाही, पत्र मिळाले की लगेच संमतिपत्र देऊ 
- वैभव हत्तुरे, नगरसेवक (भाजप)

संबंधित लेख