Solapur collector Rajendra Bhosale's pattern | Sarkarnama

 सोलापूर   जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा पॅटर्न: युवकांना उद्योगासाठी कर्जवाटपात  राज्यात नंबर वन 

प्रमोद बोडके
बुधवार, 7 मार्च 2018

आकडे बोलतात... 

टॉप फाइव्ह जिल्हे आणि त्यांचे लाभार्थी 

सोलापूर : 1 लाख 97 हजार 958 

पुणे : 1 लाख 93 हजार 345 

नागपूर : 1 लाख 73 हजार 155 

जळगाव : 1 लाख 65 हजार 258 

कोल्हापूर : 1 लाख 58 हजार 962 

सोलापूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना उद्योगासाठी सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर केली. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून आज सोलापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 97 हजार 958 जणांना या योजनेतून कर्जवाटप झाले आहे. सर्वाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात सोलापूर जिल्हा क्रमांक एकवर आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुद्रा योजनेसाठी बॅंका व ग्राहक यांच्यात समन्वय घडवून आणला. सोलापूर जिल्ह्यासाठी मुद्रा योजनेचे 362 कोटी रुपये वाटप करण्याचे उद्दिष्ठ होते. शिशू, किशोर व तरुण गटातील 1 लाख 97 हजार 958 लाभार्थ्यांना 807 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 786 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. दिलेल्या उद्दिष्ठाच्या 217 टक्के वाटप एकट्या सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 26 लाख 10 हजार 143 लाभार्थ्यांना 14 हजार 622 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 14 हजार 235 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. राज्यात सर्वांत कमी वाटप पालघर 22 टक्के, चंद्रपूर 53 टक्के, परभणी 61 टक्के, बीडमध्ये 62 टक्के झाले आहे. 

असा आहे डॉ. भोसलेंचा मुद्रा पॅटर्न 

वार्षिक पतपुरवठा आराखड्यात बॅंकांना पीक कर्ज, मुद्रा योजना यासह इतर योजनांचे उद्दिष्ठ दिले जाते. बॅंकांबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ग्राहक व बॅंक यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे व विशेष लोकशाही दिना घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याद्वारे समस्यांचे निराकरण करण्यात आले. बॅंकांना विश्‍वास व युवकांना प्रोत्साहन या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आले. 

"युवकांमध्ये खूप काही करून दाखविण्याची क्षमता आहे. युवकांसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात. योजनांचा कृती आराखडा करून त्याची अंमलबजावणी आवश्‍यक आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी कृती आराखडा व बॅंकांबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी खास लोकशाही दिन घेऊन ही योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविता आली. "

- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी सोलापूर 

 

संबंधित लेख