solapur collector office frp meeting | Sarkarnama

IAS राजेंद्र भोसले म्हणाले, कारखान्यांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देऊ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

ज्या कारखान्यांनी एफआरपी दिल्याबाबत चुकीची माहिती दिली आहे. त्यांची यादी साखर आयुक्तांनी आम्हाला द्यावी. त्या कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून आम्ही शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देऊ. एफआरपीचा कायदा कारखानदारांना पाळावाच लागेल. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी  

सोलापूर : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी प्लस दोनशे रुपये मिळावेत. एफआरपी एकरकमी मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भंडारकवठेतील लोकमंगल साखर कारखान्यासमोर उपोषण पुकारण्यात आले होते. एकरकमी एफआरपी देऊ असा लेखी हवाला कारखानदारांच्यावतीने साखर सहसंचालकांनी घेतल्याने उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशिय सभागृहात झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपीबाबत कारखनदारांच्या प्रतिनिधींनी मौन बाळगले. त्यांच्या या मौनावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत एफआरपी देण्याचा कायदा आहे. तुम्हाला कायदा पाळवा लागेल. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल अशी सूचना केली. एकरकमी एफआरपी देत असल्याबाबत कारखान्यांनी सोमवारपर्यंत (ता. 26) पर्यंत लेखी पत्र देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. भोसले, सहसंचालक संजयकुमार भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, स्वाभिमानीचे रविंद्र तुपकर, विजय रणदिवे, महामुद पटेल, सत्तार पटेल यांच्यासह प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 

सिध्देश्‍वर, मातोश्री आणि गोकुळ कारखान्याने गेल्या हंगामाची एफआरपी दिल्याचे लेखी दिले आहे. या कारखान्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. एकरकमी एफआरपी देण्याबाबत आजच्या बैठकीत लोकमंगल, गोकुळ-माऊली, जयहिंद या कारखान्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. बाकीच्या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास सहसंचालकांचे पत्र घेऊन आम्ही न्यायालयात जाऊ. कारखान्यांच्या आणि सहकारमंत्र्यांच्या घरासमोर पुन्हा आंदोलन करु. 
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष,

स्वाभिमानी शेतकरी संघटना  

 

संबंधित लेख