solapur collector initative for maratha | Sarkarnama

मराठा प्रश्‍नांसाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

समाज कोणताही असो त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्राधान्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींची दखल घेऊन ही उपाय योजना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन म्हणून ज्या गोष्टी करणे शक्‍य आहे त्या गोष्टी केल्या जात आहेत. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर 
 

सोलापूर : मराठा आरक्षणावरून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने इतर प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न असो की शैक्षणिक शुल्क याबाबत भेडसावणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी सोलापूर विद्यापीठात कक्ष निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के शिक्षण शुल्क घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे परंतु काही महाविद्यालये शंभर टक्के शुल्क घेत आहेत. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठात स्वतंत्र कक्ष स्थापन करून या कक्षात सोलापूर विद्यापीठ व उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के शुल्क भरले आहे त्यांना 31 जुलैपूर्वी 50 टक्के शुल्क परत देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. येत्या 10 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार वसतिगृहासाठी शासकीय जागेचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्याचेही नियोजन त्यांनी आखले आहे. 

 

संबंधित लेख