सोलापूर भाजपला दोन देशमुखांच्या गटबाजीत बुरे दिन? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत केलेल्या आवाहनानुसार सोलापूरकरांनी भाजपला पूर्ण बहुमत दिले. मात्र, महापालिकेतील मिळालेल्या बहुमताचा उपयोग पक्षवाढीपेक्षा गटवाढीसाठी केला जात आहे. भविष्यात ही गटबाजी न थांबल्यास भाजपला "बुरे दिन' येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही गटबाजी थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्यासंदर्भातील आर्त टाहो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी फोडला आहे.
सोलापूर भाजपला दोन देशमुखांच्या गटबाजीत बुरे दिन? 

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत केलेल्या आवाहनानुसार सोलापूरकरांनी भाजपला पूर्ण बहुमत दिले. मात्र, महापालिकेतील मिळालेल्या बहुमताचा उपयोग पक्षवाढीपेक्षा गटवाढीसाठी केला जात आहे. भविष्यात ही गटबाजी न थांबल्यास भाजपला "बुरे दिन' येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही गटबाजी थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्यासंदर्भातील आर्त टाहो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी फोडला आहे. 

सोलापूर शहर-जिल्हा भाजपमध्ये असलेली गटबाजी ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ता येण्यापूर्वीसुद्धा ही गटबाजी होती. मात्र, सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा वापर गटबाजी वाढविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. अगदी सुरवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला ही गोष्ट खटकू लागली आहे. गटबाजीमध्ये अडकलेल्या भाजपला भविष्यात "बुरे दिन' येऊ शकतील, असे पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नाही. महापालिकेत नुकत्याच झालेल्या विशेष समितीच्या निवडणुकीत या गटबाजीचाच फटका पक्षाला बसला आहे. भाजपमध्ये असलेल्या गटबाजीची जाणीव ठेवून विरोधकांनी एकत्र येण्याचा डाव रचला त्यात ते यशस्वी झाले. महापालिकेत कामकाज करताना भाजपच्या नेत्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. अन्यथा अनुभवी असणाऱ्या विरोधकांकडून पदोपदी कोंडी केली जाण्याची शक्‍यता आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख या दोन देशमुखांमध्ये असलेला संघर्ष सोलापूरवासियांना नवा नाही. मात्र, या संघर्षाचे विपरीत परिणाम पक्षावर होऊ लागला आहे. दोघांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होऊ लागला आहे. त्यामुळेच तो पक्षापासून दूर जातो की काय याची भीती वाटू लागली आहे. महापालिकेत नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी गटबाजी उफाळून आली होती. या वेळी तर पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेला आदेशही महापालिकेतील स्थानिक नेत्यांनी मानला नाही. यावरूनच पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ असल्याचे शिस्तबद्ध असलेल्या भाजपमध्ये दिसून येऊ लागले आहे. 

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त पक्षाच्यावतीने विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यामध्येही गटबाजी दिसून येते. मागील आठवड्यात जिल्हा भाजपच्यावतीने विस्तारकांसाठी कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गैरहजेरी चर्चेचा विषय झाली होती. पक्षाबरोबरच इतर कोणत्याही कार्यक्रमात हे देशमुख एकत्र येण्याचे कटाक्षाने टाळतात. ही गोष्ट कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सलत आहे. 

2019 च्या निवडणुकीवर परिणाम 
केंद्र व राज्यातील सत्तेचा लोकांच्या विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी दोन्ही देशमुखांमध्ये असलेली गटबाजी थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना योग्य पावले उचलावी लागतील. अन्यथा या गटबाजीचा फटका पक्षाला 2019 च्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही, असेही सर्वसामान्य कार्यकर्ते बोलत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com