solapur bjp mp active | Sarkarnama

सोलापुरचे भाजप खासदार "ऍक्‍टिव्ह'; गटबाजी संपवणार! 

प्रमोद बोडके 
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

विद्यापीठाच्या विषयावर पाळले मौन 
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी धनगर समाजाने तर शिवयोगी सिध्देश्‍वरांचे नाव देण्यासाठी लिंगायत समाजाने मोर्चे काढले. विद्यापीठाला काय नाव असावे?, लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय प्रयत्न करणार? या प्रश्‍नावर खासदार बनसोडे यांनी मौन पत्कारले. मी आता महापालिकेत आलोय आपण महापालिकेच्याच विषयावर चर्चा करू म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. 

सोलापूर : बहुमताने सोलापूर महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपने गटबाजीचा गोंधळ सुरू केला आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. जनमानसात नाराजी निर्माण होऊ लागली आहे. महापालिकेतील गटबाजीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. सभागृहातील गटबाजी आता या पुढे दिसणार नाही. त्यासाठी आपण स्वतः महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असल्याची माहिती खासदार शरद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

खासदार बनसोडे यांनी आज महापालिकेत आयुक्त व झोन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्राचा निधी कशा पद्धतीने मिळविता येईल, यासाठी त्यांनी सूचना केल्या. महापालिकेतील बैठक संपल्यानंतर महापालिका पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेच्या सभागृहात दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा कधी घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यापुढे जर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोणी गटबाजी केली तर त्यांच्या कानात मी स्वतः धोक्‍याची घंटा वाजवणार असल्याची माहितीही खासदार बनसोडे यांनी दिली. 

महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्यासाठी आपण आता सोलापूरचा मुक्काम वाढविणार आहे. पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटतील, सामंजस्य घडेल आणि विकासाची गाडी भरधाव वेगाने निघेल, असा विश्‍वासही खासदार बनसोडे यांनी व्यक्‍त केला. दोन्ही मंत्री देशमुखांच्या गटाचे मनोमीलन करण्यासाठी आपण टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख