आत्महत्यांवर उपाय - 2 रुपये किलोने धान्य - भाजपची सोशल मिडीया कॅम्पेन

आत्महत्यांवर उपाय - 2 रुपये किलोने धान्य - भाजपची सोशल मिडीया कॅम्पेन

नाशिक- शेतकरी आत्महत्यांवर रामबाण उपाय काय? तर आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना दोन रुपये किलोने धान्य वितरण. ही काही पारावरची वाचाळ चर्चा नव्हे. भाजपच्या 'मिडीया मॅनेजर्स'नी आखलेली 'सारे काही शेतकऱ्यांसाठी...' ही सोशल मिडीया कॅम्पेन आहे. शेतकरी संपाची सरकारविरोधी चर्चा व पोस्टचा नेटीझन्सकडून सोशल मिडीयावर पाऊस पडतोय. त्यावर पर्याय म्हणून भाजपने आखलेल्या या कॅम्पेनमुळे बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती होते की काय? अशी चर्चा रंगली आहे.

शेतकरी संपाची झळ शेतकऱ्यांपेक्षाही सामान्य नागरीकांनाही तेव्हढीच बसण्याची भिती आहे. त्याला सामोरे कसे जावे, यावर सत्ताधारी नेत्यांत मोठा खल सुरु आहे. त्याबाबत आमदार, खासदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून फिडबॅक व सूचना घेतल्या जात आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील भाजपची कोंडी झाली असून जो पदाधिकारी सरकारचे समर्थन करेल त्याचे राजकीय भविष्य संकटात पडेल हे जाणकारांना माहित असल्याने त्यांनी मौन बाळगले आहे.

मुंबईतील 'मिडीया मॅनेजर्स' मात्र यावर आक्रमक कॅम्पेन करावे, या मताचे आहेत. त्यांनी तसे कॅम्पेन देखील आखले असून त्याच्या काही स्लाईडस्‌ प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख नेत्यांना पाठवल्या आहेत. 'सारे काही शेतकऱ्यांसाठी..' या कॅम्पेनच्या स्लाईडमध्ये अन्नसुरक्षेसाठी 'आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 रुपये किलोने गहू, 3 रुपये किलोने तांदूळ वाटप करणे हा उपाय सांगीतला आहे. दोन वर्षात 68 लाख शेतकऱ्यांना 1400 कोटींचे धान्य वितरीत केले. पाल्याचे शिक्षणशुल्क माफ केले.' अशी माहिती दिली आहे. याच धरतीवर 'शाश्‍वत सिंचनाचा ध्यास', 'धडक सिंचन विहिर', 'शेतमालाच्या भाववाढीसाठी उपाययोजना', 'कृषीप्रक्रिया उद्योगांची उभारणी', 'दूध उत्पादनाला चालना', 'फलोत्पादन विकास' असा या स्लाईड आहेत.

गंमत म्हणजे दुधाचा प्रश्‍न तीव्र असतांना 'भाजप सरकार सत्तेवर आल्यावर दूधाचे दर चार रुपयांनी वाढले' असे विधान ठळकपणे नोंदविले आहे. त्यामुळे हे कॅम्पेन आखणाऱ्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था व भागाच्या प्रश्‍नांची कितपत जाण असावी, याविषयीच शंका निर्माण होते. येत्या एक दोन दिवसांत हे कॅम्पेन जोरकसपणे राबविले जाईल. त्याच्या जोडीला पतसंस्थांची कर्जे व नेत्यांकडून त्याचा वापर, कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, काँग्रेसच्या काळातील कामकाजाच्या नकारात्मक पोस्टचा भाजपच्या सोशल मिडीया विभागाकडून पाऊस पडेल. त्यातील बहुतांश पोस्ट जुन्याच असल्याने हा 'शीळ्या कढीचा ऊत' भाजपला फायदा करुन देते की बुडत्याचा पाय आणखी खोलात नेते हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com