smita r r patil's memories about sharad pawar | Sarkarnama

आबांसाठी पवारसाहेबही रडले, आता तेच आमचे 'आबा' आहेत!

​ संपत मोरे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस.

ज्यावेळी आबा गेले तेव्हा आम्हा तिघा भावंडांना पवारसाहेबांनी जवळ घेतलं, सांगितलं "खचायच नाही, मी तुमच्या सोबत आहे." त्यावेळी साहेबांनी आमच्या पाठीवरून फिरवलेला हात आम्हाला आधार देऊन गेला. आज आबा नाहीत पण ते दुःख विसरायचं बळ साहेबानी आम्हाला दिलंय, अशा भावना आर. आर. आबा यांच्या कन्या स्मिता पाटील- थोरात यांनी व्यक्त केल्या. 

"आबांच्या आजारपणात साहेबांनी आबांची घेतलेली काळजी मी जवळून बघितली आहे. साहेब अनेकवेळा दवाखान्यात येऊन गेलेच पण रोज चार वेळा डॉक्टरांना फोन करून तब्बेतीची विचारपूस करायचे. आमचीही चौकशी करायचे. याकाळात प्रतिभाताई, सुप्रियाताई रोज दवाखान्यात यायच्या. मला, माझ्या आईला आधार द्यायच्या. आबा गेल्यावर आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आम्हा भांवडांना खूप दुःख झालं.

आम्ही आबांच्या आठवणीने एकमेकांच्या गळ्यात पडून रडायचो. जेव्हा साहेब भेटायला आले तेव्हा त्यांनी मला, सुप्रिया आणि रोहितला जवळ घेतलं. माझे डोळे पुसत साहेब म्हणाले, 'खचायच नाही पोरांनो मी तुमच्या सोबत आहे. आर आर माझ्यासाठी कोण होता....असे साहेब म्हणत असतानाच साहेबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागले. आबांच्यासाठी साहेबही रडले." अशी आठवण स्मिता यांनी सांगितली.

"आबांच्यानंतर साहेबच आमचे आबा झाले आहेत, आम्ही साहेबांच्यात आबांना पहातोय. "असं त्यांनी सांगितलं. 

संबंधित लेख