Smart city project on fast track in Pimpri chinchwad | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अभियानाला वेग 

संजीव भागवत: सरकारनामा न्युज ब्युरो 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

 स्मार्ट सिटी अभियानाच्या राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने या महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी विशेष उद्देश वहन(एसपीव्ही) कंपनी ही नगर विकास विभागाने स्थापन केली असून विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे या एसपीव्ही कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या कंपनीच्या कामाचा वेग लक्षात घेता केंद्र आणि राज्याकडून लवकरच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या विकासाला लागणारा एक हजार कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

मुंबई: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाला वेग आला आहे.
 स्मार्ट सिटी अभियानाच्या राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने या महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी विशेष उद्देश वहन(एसपीव्ही) कंपनी ही नगर विकास विभागाने स्थापन केली असून विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे या एसपीव्ही कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 

या कंपनीच्या कामाचा वेग लक्षात घेता केंद्र आणि राज्याकडून लवकरच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या विकासाला लागणारा एक हजार कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील स्मार्ट सिटीसाठीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली एसपीव्ही ही कंपनी अधिनियमानुसार स्थापन करण्यात आली असून या कंपनीच्या रचनेत महापालिका, राज्य शासन, केंद्र सरकार, स्वतंत्र संचालक यांच्यासह 15 संचालक मंडळाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहा, राज्य शासनाचे चार, केंद्र सरकारचा एक आणि त्यासोबत दोन स्वतंत्र संचालक, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि महापालिकेचे महापौर, स्थायी समिति अध्यक्ष, व विरोधी पक्ष नेते हे नामनिर्देशीत सदस्य आहेत. तर समितीचे अध्यक्ष म्हणून नगर विकासचे प्रधान सचिव नितिन करीर काम पाहत आहेत. यामुळे सर्व कामाला वेग आला असून यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रस्ते, पाणी, वीज आदी अनेक प्रकारच्या सोयीसुविधांचा लाभ येत्या काही महिन्यांमध्ये मिळणार आहे. 
राज्यात स्मार्ट सिटीसाठी एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या तब्बल 40 शहरांची चाचपणी करण्यात आली होती.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सर्वाधिक राज्यातील बृहन्मुंबई,नवी मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती, सोलापूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद अशा 10 शहरांचा समोवश झाला होता. यापैकी नवी मुंबई महापालिकेच्या महासभेने या स्मार्ट सिटीत सामील होण्यास नकार दिला तर मुंबई महापालिकेनेही स्वारस्य दाखवलेले नाही. 

यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर या दोन शहरांचा तर दुसर्या टप्प्यात कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, ठाणे आणि औरंगाबाद या पाच अशा एकुण सात शहरांचा समावेश झाला आहे. यात उर्वरित शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड, अमरावती महापालिकेत मागील काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाकडून एसपीव्हीचे गठण करण्यात आले असून यात दोन्हीही ठिकाणच्या एसपीव्ही कंपनीचे काम जोरात सुरू असल्याची माहिती नगरविकास विकास विभागाकडून देण्यात आली. 

संबंधित लेख