six policeman suspended | Sarkarnama

"हजेरी मेजर' खूष, मात्र एसपी नाखूष : 6 पोलिस निलंबित ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

मुख्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून हजेरी मेजरांकडून ऑन ड्युटी दाखवून हॉलिडेला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. काही कर्मचारी महिनोमहिने गैरहजर असतात पण हजेरी मेजरांना त्याबदल्यात लक्ष्मीदर्शनास सोनेही देण्याची परंपरा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऑन ड्युटी हॉलिडेला चाप लावण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी आता अधिक कडक भुमिका घेणे गरजेचे आहे. 

सातारा : हजेरी मेजरला हाताशी धरून खोटी ड्युटी दाखवत कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सातारा पोलिस मुख्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले आहे. 

कारवाईत झालेल्यांत हजेरी मेजर म्हणून काम करणारे सहायक फौजदार एस. एन. निकम, ए. एल. अहिरे तसेच पोलिस नाईक शोभा वरे, एस. एस. खाडे, हवालदार व्ही. टी. पाटील, कॉन्स्टेबल के. डी. चव्हाण यांचा समावेश आहे. कर्तव्यात कसूर तसेच बेजबाबदारपण, हलगर्जीपणा केल्यामुळे दोन हजेरी मेजरसह चार पोलिसांना अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले. पोलिस कॉन्स्टेबलच्या नावासमोर प्रत्यक्ष ड्युटी न देता खोटी ड्युटी दाखवून हजेरी मेजरने आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. तसेच कोणतीही परवानगी न घेता हे कर्मचारी परस्पर गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत प्राथमिक चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. 
 

संबंधित लेख