six engineers suspended in Badlapur TDR scam | Sarkarnama

बदलापूर टीडीआर घोटाळ्यातील सहा अभियंते निलंबित

सरकारनामा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

बदलापूर पालिकेच्या इतिहासात खळबळ उडवणारा घोटाळा म्हणून टीडीआर घोटाळ्याकडे पाहिले जाते.

बदलापूर :  बदलापूर पालिकेतल्या सर्वात वादग्रस्त टीडीआर (ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट अर्थात विकास हस्तांतरण नियम) घोटाळ्यात आरोपी असलेले  सहा अधिकारी आणि अभियंत्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांच्या अटकेनंतर अभियंत्यांचे धाबे दणाणले होते. त्यातच तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी घेतल्याने गोसावींच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

त्यापाठोपाठ तत्कालीन अभियंते आणि सध्या कुळगाव बदलापूर तसेच अंबरनाथ नगरपालिकेत सेवा देणाऱ्या चार अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बदलापूर पालिकेच्या इतिहासात खळबळ उडवणारा घोटाळा म्हणून टीडीआर घोटाळ्याकडे पाहिले जाते. तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंते आणि विकासक या सर्वांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. एकूण 55 प्रकरणात अनियमितता झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे.

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पालिकेचे अभियंते यात जामिनावर सुटलेले होते. तीन वर्षे यातील आरोपी आणि तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागत नव्हते. गेल्या महिन्यात गोसावी यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. 

गुरूवारी नगरविकास विभागाने टीडीआर घोटाळ्यातील सर्व सहा अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. यात सध्या अंबरनाथ पालिकेत कार्यरत असलेले सहाय्यक नगररचनाकार सुनिल दुसाने, बदलापूर नगरपालिकेत कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता निलेश देशमुख, कनिष्ठ अभियंता कीरण गवळे आणि अशोक पेडणेकर तसेच सध्या रत्नागिरी नगरपालिकेत कार्यरत असलेले अभियंता तुकाराम मांडेकर आणि प्रवीण कदम यांच्या निलंबनाचे आदेश नगरविकास विभागाने दिल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे.  

संबंधित लेख