Sillod Election MIM may Created Challenge to Congress's Abdul Sattar | Sarkarnama

सिल्लोड नगरपालिकेत सत्तारांना घेरण्यासाठी एमआयएम-वंचित आघाडीही मैदानात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सिल्लोड नगरपालिकेच्या स्थापनेपासूनच तिथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासाठी पुन्हा नगरपालिका ताब्यात घेणे तेवढे सोपे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

औरंगाबाद : गेली पंचवीस वर्ष सिल्लोड नगरपालिकेवर एकहाती सत्ता राखत आघाडी सरकारच्या काळात मंत्री पदापर्यंत पोहचलेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांना घेरण्यासाठी एमआयएम-वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात उतरली आहे. जानेवारीत सिल्लोड नगरपालिकेसाठी मतदान होणार असून सत्तारांपुढे सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 

सिल्लोड नगरपालिकेच्या स्थापनेपासूनच तिथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासाठी पुन्हा नगरपालिका ताब्यात घेणे तेवढे सोपे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगरपालिकेतील सत्तेच्या जोरावरच सत्तार यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंत बहरत गेली. अगदी आघाडी सरकारच्या काळातील मंत्रीपदापर्यंत पोहचवण्यात देखील सिल्लोड नगरपालिकेतील निर्विवाद वर्चस्वाची मोठी भूमिका राहिली आहे. सोयीची वार्ड रचना करून घेतल्याचा आरोप देखील सत्तार यांच्यावर विरोधकांकडून वारंवार केला गेला. 

एमआयएमच्या एन्ट्रीने सत्तारांचे गणित बिघडणार....
एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तारांनी आतापर्यंत सिल्लोड नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली. पंचवीस वर्षातील दोनवेळा अनुक्रमे पत्नी आणि आता मुलगा यांना नगराध्यक्ष करत सत्ता घरातच ठेवण्यात त्यांना यश आले होते. परंतू, सत्तारांचे सत्ता केंद्र उध्दवस्त करण्यासाठी नगरपालिकेच्या आखाड्यात पहिल्यांदाच 'एमआयएम'ची एन्ट्री होणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात एक वेगळा प्रयोग सुरू केला आहे. तो कितपत यशस्वी होणार हे सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीतून दिसेल असे बोलले जाते. 

एमआयएम-वंचित आघाडीमुळे काँग्रेसच्या दलित-मुस्लिम मतांवरच घाला घालण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडी-एमआयएमची ही खेळी यशस्वी झाली तर भाजपचे फावेल आणि सिल्लोड नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन होईल असा दावा केला जातोय. एवढेच नाही तर सत्तारांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपकडूनच 'एमआयएम'ला बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. 

ओवेसी, आंबेडकर प्रचाराला येणार
सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणूकीत पुर्ण ताकदीनिशी उतरूण अब्दुल सत्तार यांना धक्का देण्याची जोरदार तयारी 'एमआयएम'चे बनेखा पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली आहे. सोबतीला दलित आणि वंचित बहुजनांची मदत देखील त्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दलित-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून ते वंचित बहुजन व एमआयएमकडे वळवण्यासाठी नगरपालिकेच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभा देखील सिल्लोडमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

कॉंग्रेसच्या विरोधात एमआयएमने जारेदार तयारी केलेली असतांनाच भाजपने देखील दोघांच्या भांडणाचा फायदा करून घेत पहिल्यादांच सिल्लोड नगरपालिकेत भाजपचे कमळ फुलवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी याकामी लक्ष घातले असून कॉंग्रेसला सुरूंग लावत अनेक विद्यमान नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. 

जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर सिल्लोड नगरपालिकेची हीच पहिली निवडणूक आहे. एससी राखीव नगराध्यपदासाठी भाजपने उमेदवारांची चाचपणी केली असून वर्षभरापुर्वीच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक तायडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. आयात केलेल्या उमेदवाराला विरोध झाला तर मुळ भाजपचे विष्णू काटकर यांच्या गळ्यात देखील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ पडू शकते. 

कॉंग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक असलेल्या राजरत्न निकम यांचे एकमेव नाव सध्या नगराध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. तर पुर्ण ताकदीनीशी मैदानात उतरलेल्या एमआयएमकडून प्रभाकर पारधे यांना नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. 

एकंदरित गेली पंचवीस वर्ष सिल्लोड नगरपालिकेची एकतर्फी होणारी निवडणूक यंदा मात्र कॉंग्रेस- भाजप- एमआयएम-वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि चुरशीची होणार आहे. 26 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा 27 जागांसाठी येत्या जानेवारीत मतदान होणार आहे. सिल्लोड नगर पालिकेच्या निवडणुकीकडे आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. 

संबंधित लेख